Manobodh by Priya Shende Part 89 : मनोबोध भाग 89

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 89 (Manobodh by Priya Shende Part 89)

जनी भोजनी नाम वाचे वदावे

अती आदरे गद्यघोषे म्हणावे

हरी चिंतने अन्न सेवीत जावे

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

 

ह्या श्लोकात समर्थ आपल्याला सांगताहेत की रामानाम केव्हा घ्यावं. कसं घ्यावं.

हे सांगताना पहिल्या चरणात ते म्हणताहेत की, “जनी भोजनी नाम वाचे वदावे””.  आपण रामनाम स्वतः तर घ्यावच. पण पंक्तीत असताना घ्यावं. खूप संख्येने असणाऱ्या जनमानसात घ्यावं. भोजन करताना घ्यावं.  सर्व लोकांना ऐकायला येईल अशा पद्धतीने घ्यावं.  जेणेकरून त्यांच्या कानावर पण रामनाम येईल. आपण करत असलेल्या रामनामाचा लाभ त्यांनाही मिळेल.  सर्वत्र रामनाम भरून राहील, आणि तिथलं वातावरण पण राममय होईल.

बरं रामनाम घ्यायचंय ते कसं घ्यायचं, हे सांगताना पुढच्या चरणात ते म्हणताहेत की,”अती आदरे गद्यघोषे म्हणावे”. जे रामानाम घ्यायचंय ते भोजन करण्यापूर्वी घ्यायचंय.  पंगतीत असताना घ्यायचंय.  सर्व लोकांमध्ये घ्यायचंय. पण ते अती आदरपूर्वक घ्यायचे.  गद्य घोषे म्हणजे मोठ्याने म्हणायचे. तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणायचं नाहीये, तर मोठ्या आवाजात पण अत्यंत आदराने घ्यायचंय.  ते मोठ्याने म्हणल्याने त्याला एक (Manobodh by Priya Shende Part 89) नैसर्गिक गोडवा येतो, त्यामुळे सगळ्यांना ते रामनाम घ्यावसं वाटतं आणि त्यानिमित्ताने प्रभु चे नाम आपण उच्चारतो.

समर्थ पुढे म्हणतात की, “हरी चिंतने अन्न सेवीत जावे”. जेवताना हरी चिंतन करावे. यासाठी त्यांनी जेवताना एक श्लोकही सांगितला आहे जो की अजूनही पंक्तीत म्हणतात तो म्हणजे,

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वां अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

यामध्ये समर्थन सांगायचे की अन्न सेवन हे केवळ उदरभरण म्हणजे पोट भरणं असं नसून ते रोज करायचं यज्ञ कर्म आहे.  यज्ञामध्ये आपण आहुती देतो आणि देवाला संतुष्ट करतो तसंच आपण एकेक घास घेत असताना आपल्या पोटात असलेल्या वैश्वानराला आहुती देऊन तृप्त करत असतो, आणि हा वैश्वानर म्हणजेच साक्षात भगवंतच आहे.

तर ते भोजन सेवन करत असताना त्या भगवंताची स्तुती करत त्याचं चिंतन करत जर जेवलोत तर भगवंत संतुष्ट होऊन आपण दिलेली आहुती आनंदाने स्वीकारेल.  आपण दिवसातून चार-पाच वेळा तरी थोडं थोडं खात असतो आणि प्रत्येक वेळेला जर आपण देवाचं नाव घेऊन नामस्मरण केलं तर किमान दिवसातून 40-50 वेळा तरी प्रभूचं नाव घेतलं जाईल. आणि ते भगवंतापर्यंत सहज पोहोचेल म्हणूनच ते अत्यंत आदरपूर्वक घेतलं पाहिजे.

 

IPL 2023 : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कडून पराभूत; रहाणेने मुंबईमध्ये दुनिया हलवली

पुढे ते म्हणतात की, “तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे”.  श्रीहरी चिंतन करता करताच अन्न सेवन करावं.  त्याच्याच नामस्मरणात तल्लीन व्हावं. अशा प्रकारे नामस्मरण भगवंताला आवडतं.  जो सदाचरण ठेवतो, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवतो, जो अत्यंत श्रद्धापूर्वक नामस्मरण करतो, भजन, कीर्तन, पूजा, तीर्थयात्रा करतो.  आपल्या (Manobodh by Priya Shende Part 89)चित्तशुद्धीमुळे भगवंताची कृपा करून घेतो. अशा भक्ताला श्रीहरी सहजपणे पावेल, असा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत.

नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही.  टीव्ही समोर बसून, मोबाईल मध्ये डोकं घालून, पुस्तक पेपर वाचता वाचता भोजन करण्यापेक्षा परमेश्वराचे नामस्मरण करत जर जेवण केलं तर ते चांगलं पचेलही  आणि परमेश्वर पावेलही.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.