Manobodh by Priya Shende Part 90 : मनोबोध भाग 90-न ये राम वाणी तया थोर हाणी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 90 (Manobodh by Priya Shende Part 90 )

न ये राम वाणी तया थोर हाणी

जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी

हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी

बहु आगळे बोलिली व्यासवाणी

 

आधीच्या कित्येक श्लोकांमध्ये समर्थांनी रामनामाचे महत्त्व सांगितलंय. त्यासाठी भगवान शंकर, मारुतीराया यांची उदाहरणे दिली आहेत.  हे रामनाम कसं आहे.. किती सुंदर, सहज, सोपं आहे.  ते केव्हा केव्हा घ्यावं, गद्यघोषे घ्यावं, आदरपूर्वक घ्यावं हे ही सांगितलंय.

आता ह्या श्लोकांत रामनाम न घेतल्यामुळे काय नुकसान होतं, हानी होते.  त्याचे काय दुष्परिणाम होतात ते समर्थ आपल्याला सांगताहेत.

पहिल्या चरणात ते म्हणताहेत की, “न ये राम वाणी तया थोर हाणी”.  समर्थ म्हणताहेत की ज्याच्या मुखातून रामानाम येत नाही त्याची मोठी हानी होते.

Old Pune-Mumbai Highway Accident : जुन्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

कसं आहे, मनुष्य जन्म मुळात दुर्लभ आहे.  त्यातही तो मर्यादित काळासाठी असतो. आयुष्यातील वीस वर्ष तर बालपण, तरुणपणात समजायला लागेपर्यंत जातात.  पुढची 30 वर्ष संसार थाटण्यात, वाढवण्यात मुलाबाळांना मोठं करण्यात जातात. पुढची दहा-बारा वर्षे मुलाबाळांची सुखदुःख बघण्यात, नातवंडांच्यात जातात.

आता म्हातारपण आलं की मग देव देव आठवतो तर तेव्हा आठवून उपयोग काय?  हातात वेळच उरत नाही रामराम जपायचं राहून जातं.  इतका माणूस संसारात अडकतो.  त्यासाठी रामनामाची सवय ही सुरुवातीपासूनच लागली पाहिजे.  नाहीतर हा दुर्लभ जन्म वाया जाईल.  हीच माणसाची सर्वात मोठी, न भरून निघणारी हानी आहे.

समर्थ पुढे सांगताहेत की, “जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी”.  आपल्याला मनुष्य जन्म मिळायला या संधीचं सोनं करावं.  ह्या जन्माचं काहीतरी चीज करावं.  जर ही संधी गेली तर आपलं जीवन व्यर्थ गेलं हे माणसाला कळेल.  पण केव्हा? तर अगदी अंतकाळी जेव्हा वेळ निघून गेलेली असेल.  तेव्हा रामनाम मुखातून येणार नाही.  कारण ती सवयच लावून घेतली नाही.

अशा वेळेस माणसाची अवस्था कठीण होते. समर्थांनी यासाठीच काणी हा शब्द वापरलाय.  काणी म्हणजे दुःखीतातील दुःखी, तुच्छ किंवा अत्यंत हीन.  अशी अवस्था रामनामा सारखे सोपे साधन हाताशी असून त्याने हा मार्ग स्वीकारला नाही, म्हणजेच त्याचे आयुष्य वाया गेले.  या जन्मात येऊन (Manobodh by Priya Shende Part 90 )काही उपयोग झाला नाही.  किडा मुंगी प्रमाणे आयुष्य गेलं.

पुढे समर्थ म्हणतात की,” हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी.  बहु आगळी बोलली व्यासवाणी”.  हरी नामाचे महत्त्व वेदशास्त्र पुराणांनी वर्णिलं आहे.  तसंच महर्षी व्यासांनी देखील हरिनामाचे महत्त्व सांगितलंय.  असं म्हटलं जातं की महर्षी व्यासांनी आधी महाभारत सांगितलं, ते गणपतींनी लिहिलं. त्यानंतर ते जसेच्या तसे घडलंय.  म्हणजेच महर्षींनी आधी वर्णन करून सांगितले त्याप्रमाणे महाभारत घडलं.  हे खरोखरीच आगळं वेगळं नाहीये का?

म्हणून समर्थ म्हणतात की बहु आगळी बोलली व्यासवाणी.  व्यासांनी महाभारतात हरीचं म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन केलं आहे.

नाम हे स्वयंसिद्ध आहे आपण एकदा ते घेतलं की आपोआप लागू पडतं. तुम्ही ते कसेही घ्या.  त्याची चांगली फळं ही मिळणारच.  एखादा लाडू जसा कोणत्याही बाजूने, कसाही खाल्ला तरी तो गोडच लागतो तसंच नामही कसेही घ्या.  केव्हाही त्याचं फळ उत्तमच मिळणार हे नक्की.  असा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.