Manobodh by Priya Shende Part 91 : मनोबोध भाग 91 – नको वीट मानू रघूनायेकाचा

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 91 – Manobodh by Priya Shende Part 91

नको वीट मानू रघूनायेकाचा

अति आदरे बोलिजे राम वाचा

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा

करी घोष त्या जानकी वल्लभाचा

 

माणसाला सारखा बदल आवडतो. एकच गोष्ट त्याला परत परत करायला सांगितली तर त्याचा त्याला कंटाळा येतो. मग ते कोणतेही काम असू दे, खेळ असू दे, अगदी नाटक सिनेमा असू दे. एकच सिनेमा बघायचा तरी फार तर चार-पाच वेळा बघू शकतो. त्यानंतर कंटाळा येतो. माणसांना संसाराचा सुद्धा कंटाळा येतो. पण तो सोडता येत नाही म्हणून माणसं आयुष्यभर रटत राहतात.

दुसरी गोष्ट अशी की ज्याचं फळ लवकर दिसेल अशा गोष्टीच माणसं करतात. जिथे फळ दिसणार नाही त्या गोष्टीकडे माणसं दुर्लक्ष करतात. कोणताही व्यायाम करायला घेतला तर त्याचे परिणाम दोन-चार दिवसात दिसत नाहीत. किमान चार महिने तरी सातत्याने चिकाटीने मेहनत घेऊन मग हळूहळू परिणाम दिसतात. त्या व्यायाम करणाऱ्याला स्वताःत बदल झालेले पाहून अजून उत्साह येतो आणि त्यातले चांगले झालेले बदल दुसऱ्यालाही दिसू लागतात. आणि जेव्हा हीच गोष्ट दुसरा बोलून दाखवतो तेव्हा त्याला अजून हुरूप येतो. आणि तो त्याचा व्यायाम चुकवत नाही. पण नामस्मरणामध्ये असं काहीच घडत नाही. त्याचा फळ दिसत नाही. ते प्राप्तही होताना दिसत नाही. दुसऱ्याला दिसायचा तर संबंधच नाही. अशा वेळेस प्रापंचिक माणूस नामस्मरणाचा कंटाळा करणारच.

हे माहीत असल्यामुळे समर्थ म्हणताहेत की, “नको वीट मानू रघुनायकाचा”. रघुनायकाचा तू वीट येऊ देऊ नको. त्याचा कंटाळा करू नकोस. अतिशय आदरपूर्वक, श्रद्धेने, निष्ठेने तू रामनाम घेत राहा. ही खात्री बाळग की काहीही झालं तरी या भवसागरातून तुला रामानांमच तारून नेणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रामानाम सोडणार नाही. त्याचं फळ या जन्मात जरी नाही मिळालं तरी चालेल, पण रामनामाचा जप चालूच असेल, असा विश्वास, निर्धार प्रत्येकाने करावा.

समर्थ हे वारंवार आपल्याला सांगत (Manobodh by Priya Shende Part 91) आहेत. अनेक उदाहरणांवरून त्यांनी आपल्याला पटवून दिला आहे की प्रापंचिक माणसाला रामनामाचाच मार्ग सोपा आहे. आपण इतर मार्गांनी पण भक्ती करू शकतो. भगवंत प्राप्ती करू शकतो. पण ती शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या अवघड आहेत. ज्याचे मार्ग काही श्रीमंतांना शक्य आहे. जसं की यज्ञ करणं, दानधर्म करणं. पण हे मार्ग गरिबांना शक्य नाहीयेत. तर कोणालाही सहज, सोपा, करता येण्यासारखा मार्ग म्हणजे नामस्मरण. रामनामासाठी ना पैसा लागतो, ना शारीरिक कष्टं. अगदी सहज सोपे साधन म्हणजे रामनाम घेणे. त्यासाठी कुठेही बाहेर जावं लागत नाही. अगदी बसल्या ठिकाणी ही साधना करता येते म्हणूनच समर्थ म्हणताहेत की, “न वेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा”.

सदा सर्वकाळी, लोकांच्यात असताना, एकांतात असताना, भोजन करताना केव्हाही हे रामनाम घेत रहा. भगवंत श्रीराम तुमचा उद्धार नक्कीच करेल. यासाठी फक्त श्रद्धा हवी. सातत्य हवं. उत्साह हवा. कंटाळा येऊ न देता, हे करत रहा असं समर्थांनी सांगितलंय.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.