Manobodh by Priya Shende Part 92-मनोबोध भाग 92 –  अती आदरे सर्व ही नामघोषे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 92-Manobodh by Priya Shende Part 92

अती आदरे सर्व ही नाम घोषे

गिरीकंदरे जाईजे दूरी दोषे

हरी तिष्ठतू तोषला नामघोषे

विशेषे हरा मानसी रामपीसे

 

https://youtu.be/z76jlFEd8Nk

 

या श्लोकात समर्थांनी नामाचा घोष करण्यास सांगितला आहे.  ते म्हणताहेत,”अती आदरे सर्व ही नाम घोषे”

नाम घेताना मोठ्या आदराने घ्यावे. अती आदरे म्हणजे अत्यंत आदराने नाम घोष करावा.  प्रभुचे नाम घ्यावे.   ते सांगताहेत नाम आदराने तर घ्याच,  पण ते मोठ्याने घ्या.  मोठ्या आवाजात घ्या. मनातल्या मनात, ओठातल्या ओठात पुटपुटत घेऊ नका, असं ते सुचवतात.  मोठ्याने नाम घेतल्यास काय होतं, तर आपल्या मनातले विचार काही काळ का होईना थांबतात.  त्या ऐवजी मनातल्या मनात नाम घेतलं तर मन भरकटच राहील.  ते एकाग्र होणार नाही.  भलतेच विचार मनात येऊ लागतील. मग त्याचा उपयोग होणार नाही.  मोठ्याने नामघोष केल्यास आपलं लक्ष रामनामावर राहील आणि तेवढ्यापुरते तरी इतर विचार बाजूला पडतील.

Pimpri News : कठोर मेहनत,एकाग्रता आणि सुनियोजित पद्धतीने केलेला अभ्यास यशाला गवसणी घालू शकतो – कुलदीप रामटेके

मोठ्याने म्हणण्याचा दुसरा फायदा म्हणजे ते नाम इतरांनाही ऐकू जाईल.  त्यांनाही रामनाम श्रवणाचा लाभ होईल आणि आपोआपच तेही रामनामाचा घोष करू लागतील.

मोठ्याने नाम घेत असू तर इतर छोट्या आवाजांचा नामावर परिणाम होणार नाही.  पण मनातल्या मनात जप केला आणि घरात कसले टीव्ही, रेडिओचे आवाज मोठे असतील तर त्याचा आपल्या नाम घोषावर निश्चित परिणाम होईल. म्हणूनच समर्थांनी रामनामाचा घोष करण्यास सांगितले.

पुढे समर्थ म्हणताहेत की,” गिरीकंदरे जाईजे दूरी दोषे”.  गिरी कंदरे म्हणजे डोंगर टेकड्या.  आपण जर नाम घोष केला.  मोठ्या आवाजात, आदराने केला, तर आपले दोष, जे आपल्या आसपास असतात, आपल्यात असतात ते दूर डोंगरांमध्ये पळून जातील.  आपल्यामध्ये गुण कमी आणि अनेकदा दोषच जास्त असतात.  ते आपल्याला ओळखता यायला हवेत.  ते दोष सोडून द्यायला पाहिजेत.  ते दोष आधीच्या जन्मापासूनचे असू शकतील.  या जन्मातले असू शकतील.  ते जर घालवायचे असतील तर साधा मार्ग आहे तो रामनामाचा.

पुढे समर्थ म्हणतात की,”हरी तिष्ठतू तोषला नामघोषे,
विशेषे हरा मानसी रामपीसे”.  नामघोषाने हरी म्हणजे भगवंत तिष्ठतू म्हणजे वाट बघतो.  आतुरतेने वाट बघतो.  कशाची तर नामघोषाची.  नामस्मरणाची.  त्याने काय होतं, तर तोषला म्हणजेच संतुष्ट झाला.  संतोष पावला. भगवंत हा भावाचा भुकेला आहे.  आपल्या नामस्मरणाने म्हणजेच आपण केलेल्या धावेमुळे देव संतोष पावतो.  समाधानी होतो.  आपल्या संकटात (Manobodh by Priya Shende Part 91) मदतीला धावून येतो.  तो आपल्या श्रद्धापूर्वक, आदराने केलेल्या नामस्मरणाची जणू वाट पाहत असतो.  त्यामुळे तो संतुष्ट होतो.  आणि म्हणूनच आपल्याला रामनामाचा ध्यास लागला पाहिजे.  वेड लागलं पाहिजे.  असा समर्थांचा आग्रह आहे.  त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भगवान शंकरांचं उदाहरण दिलं आहे.

ते म्हणतात की, “विशेषे हरा मानसी रामपीसे”.  भगवान शंकरांच्या अंतःकरणात सुद्धा रामपीसे (रामनामाचं वेड) होते आणि त्यामुळेच त्यांचा दाह थांबला.  हे समर्थांनी मागील श्लोकांत आपल्याला सांगितलंय.  तसेच रामपीसे म्हणजे त्याचं वेडं आपणही व्हावं आणि आपला उद्धार करून घ्यावा, असं समर्थांनी आग्रहपूर्वक सांगितलंय.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.