Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 93 -(Manobodh by Priya Shende Part 93)
जगी पाहता देव हा अन्नदाता
तया लागली तत्वता सारं चिंता
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे
मला सांग पां रे तुझे काय वेचे

 

 

 

ह्या श्लोकात समर्थ भगवंतांचे गुणवर्णन करत आहेत, आणि त्याचे नाम फुकट घ्यायचे तर तुझ्या पदरचं काय खर्च होतं? असा प्रश्न आपल्याला करत आहेत.
पहिल्या चरणांत ते म्हणताहेत की, “जगी पाहता देव हा अन्नदाता”. सर्व सृष्टीचा निर्माता, पालनकरता हा भगवंतच आहे.  त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक जीवाला तो अन्न देतो.  तोच पालनकरता आहे.  ज्याने चोच दिली तो घास पण देतो असं म्हणतात.   प्रत्येकाच्या अन्नाची जबाबदारी त्या भगवंताचीच आहे.  त्यामुळे त्याचे आपण कायम ऋणी असलं पाहिजे.
पण दुर्दैवानं आपण अन्नदाता म्हणजे अन्न देणारा हा भगवंत नसून, नोकरी देणाऱ्या मालकाला किंवा बायका आपल्या पतीला, जो पैसा कमवून आणतो, त्यालाच म्हणतात.  खरा अन्नदाता हा साक्षात परमेश्वरच आहे.  त्याने प्रत्येकासाठी तरतूद करून ठेवली आहे.  पशुपक्षी, वन्यजीव, किडा, मुंगी, कीटक प्रत्येकाच्या अन्नाची सोय करून ठेवली आहे.  ज्यांना ही गोष्ट पटली आहे ते मात्र सांगतात
आम्ही काय कोणाचे खातो
तो राम आम्हाला देतो
ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, की अन्नदाता हा भगवंतच आहे.
‘अन्नदाता सुखी भव’ असं भोजन देणाऱ्याला आपण म्हणतो.  पण प्रत्यक्ष बघायला गेलं तर भोजन देणारा हा परमेश्वरच आहे.  त्याचे कायम गुणगान केलं पाहिजे.  संपूर्ण सृष्टीला अन्न देतो.  काय अचाट महिमा आहे ना त्याचा?
एकदा लक्ष्मी विष्णूंना विचारते, ‘तुम्ही म्हणता की सगळ्यांना तुम्ही देता, तर मी एका तब्येत लपवून ठेवलेल्या मुंगीला कसं अन्न मिळालं असेल? ती उपाशी असणार याची मला खात्री आहे. तर दाखवा बरं तिचं पालन कसं केलं ते’? असं म्हणत की डबी त्यांच्यासमोर उघडते आणि बघते तर काय, त्या डब्बीत एक (Manobodh by Priya Shende Part 93) खडीसाखरेचा दाणा मुंगी खात असते.  यावरून आपल्या लक्षात येईल, की प्रत्येक जीवाच्या अन्नाची सोय विधात्याने केली आहे.
पुढे समर्थ म्हणत आहेत की, “तया लागली तत्वतां सार चिंता”.  भगवंताला सर्वांची चिंता असते.  तोच आपला चरितार्थ, योगक्षेम चालवत असतो. हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे.  त्यासाठीच आपली सारी चिंता, दुःख त्यालाच अर्पण करावीत.  पण बऱ्याच जणांना असं वाटतं, की माझा अन्नदाता कोणी वेगळा आहे. तर तसं नाहीये.  आजारी माणसाने कोणातर्फे डॉक्टरचा औषध आणून ते घेतलं.  म्हणजे औषध देणारा माणूसाने आजारी माणसाला बरं केलं नाही.  तर डॉक्टरने दिलेल्या औषधामुळे त्याचा आजार पळून गेला. आणणारा माणूस फक्त भार वाहक होता.  त्याला बरं करणारा वैद्य हा वेगळाच आहे.   तसंच अन्नदाता हा परमेश्वरच आहे. फक्त तो कोणाला मालकातर्फे देतो.  पण शेवटी ते निर्माण केले ते भगवंतानेच.  म्हणून भोजनापूर्वी आणि भोजन संपल्यावर परमेश्वराचे कृतज्ञतेने आभार मानावेत.
पुढे समर्थ म्हणतात की,”तयाचे मुखी नाम घेता फुकाचे,  मना सांग पां रे तुझे काय वेचे”.  जो आपलं योगक्षेम चालवतो, आपल्याला अन्न देतो, आपलं दुःख निवारण करतो.  त्याचं नाव घेण्यासाठी बा मना तुझ्या पदरचं काय खर्च होतं? हे सांग बरं. असा प्रश्न ते करत आहेत. आपण हे समजून घेतलं पाहिजे.
जी गोष्ट आपल्याला सहजासहजी फुकट मिळते, त्यासाठी पैसे खर्च करायचे नाहीत, तर मग तुला श्रद्धेने.. आदरपूर्वक रामनाम घ्यायला काय हरकत आहे?  अशा पद्धतीने समर्थ आपल्याला सांगून रामनामाचा आग्रह धरत आहेत.
आपण मुलांना नाही का आग्रह धरत की बाबांनो तुम्हाला सगळ्या सुख सोयी दिल्यात.  पौष्टिक अन्नं, चांगलं घर, शाळेसाठी गाडी, वह्या-पुस्तकं, शाळा आणि हे सगळं एकदम अनुकूल परिस्थितीत असतानासुद्धा, तू तुझा अभ्यास मनापासून करायला काय अडचण आहे?  तू अभ्यास करायलाच पाहिजे, कारण सर्व परिस्थिती तुला अनुकूल आहे. असा आपण आग्रह धरतो आणि पटवून सांगतो.
तसंच समर्थ देखील आपल्याला प्रश्न विचारून पटवून देत आहेत, की फुकटचं नाम घेण्यासाठी कुचराई करू नका. कारण यातच तुमचं भलं आहे.  तुमचं हीत समावलं आहे.  संसारी माणसांना पैसा खर्च करून काही करावं, या गोष्टीला विरोध असतो.   शक्यतो फुकट काय आहे का, ते बघतात.   संसारात राहून ही प्रवृत्ती बनते, हे समर्थांनी जाणलंय.   म्हणूनच ते आपल्याला जाणवून देतात की रामनाम फुकाचे आहे. आणि म्हणून ते प्रत्येकाने (Manobodh by Priya Shende Part 93) स्वीकारावं आणि अंगीकारावं.
जय जय रघुवीर समर्थ 
प्रिया शेंडे 
मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.