Manobodh by Priya Shende Part 94 : मनोबोध भाग 94 – तिन्ही लोक जाळू शके कोप येता

एमपीसी न्यूज :  मनाचे श्लोक क्रमांक 94 – Manobodh by Priya Shende Part 94

तिन्ही लोक जाळू शके कोप येता

तिन्ही लोक जाळू शके कोप येता

निवाला हरू तो मुख नाम घेता

जपे आदरे पार्वती विश्वमाता

म्हणोनी म्हणा तेचि ते नाम आता

या श्लोकांत रामनामाचे महत्त्व सांगताना पुन्हा एकदा भगवान शंकर-पार्वतीचे उदाहरण घेऊन नामाचा महिमा सांगितलाय.

पहिल्या चरणांत समर्थ म्हणतात की,”तिन्ही लोक जाळू शके कोप येता”. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की भगवान शंकरांना महादेव किंवा देवाधिदेव असंही म्हणतात.   इतर सर्व देवांमध्ये महादेवाचे स्थान उच्चं आहे. म्हणूनच तर त्यांना महादेव असं म्हणतात.  सर्वांच्या मनामध्ये ठसण्यासाठी समर्थ पुन्हःपुन्हा महादेवाचेच उदाहरण घेऊन नामाचा महिमा आपल्याला सांगताहेत.

समर्थ म्हणतात की भगवान शंकरांजवळ एवढी अफाट शक्ती आहे, की ते तिन्ही लोक म्हणजेच स्वर्ग- पृथ्वी- पाताळ यांना एकाच वेळेस जाळून भस्म करू शकतील. यासाठी त्यांना तिसऱ्या डोळ्याचा वरदान आहे. हा तिसरा डोळा जर का उघडला तर त्याच्या तेजाने तिन्ही लोक जाळून भस्म होतील.   असे सामर्थ्यशील भगवान शंकर सुद्धा रामनाम जपतात.  रामानमाचा आश्रय घेतात.  (Manobodh by Priya Shende Part 94)  जेव्हा शंकरजींनी हलाहल (विष) पचवलं तेव्हा त्यांना प्रचंड दाह झाला. ज्या शंकरांच्यांत तिन्ही लोकांचं भस्म करण्याची शक्ती आहे, अशा शंकरांना हा दाह सहन होईना. म्हणून ते अस्वस्थ झाले.  त्यासाठी त्यांनी डोक्यावर शीतल चंद्र धारण केला. थंड अशी गंगा नदी जटेत धारण केली. परंतु तरीदेखील दाह थांबना.  मग त्यांनी रामनामाचा धावा सुरू केला, तेव्हा भगवंताने कृपादृष्टी करून त्यांचा दाह थांबवला.  म्हणजे शंकरजींसाठी सुद्धा रामनाम सर्वश्रेष्ठ ठरलं आणि त्यामुळेच ते शांत झाले.   म्हणूनच समर्थांनी म्हणलंय की, “निवाला हरू तो मुख नाम घेता”.

 

 

पुढे समर्थ म्हणताहेत की,”जपे आदरे पार्वती विश्वमाता”.  भगवान शंकरांसोबत पार्वतीमातेला देखील ही गोष्ट माहित आहे.  ती सुद्धा आदिमाता आहे.  संपूर्ण विश्वाचे मातृत्व पार्वतीकडे आहे, म्हणून तिला जगन्माता म्हणतात.  ती पार्वतीमाता सुद्धा अत्यंत आदराने श्रद्धेने भगवंताचे नाम घेते, भगवान शंकर, मातापार्वती हे सुद्धा रामनामाचा महिमा जाणून आपलं संकट नामस्मरणाने दूर करतात. अत्यंत श्रद्धेने, आदरपूर्वक रामनामाचा जप करतात.  त्यामुळेच समर्थसुद्धा आपल्याला पटवून देत आहेत की आपण सुद्धा हेच नाम घ्यायला हवं.

मुखातून रामनाम घेणे आवश्यक आहे. (Manobodh by Priya Shende Part 94)  त्यामुळेच आपला उद्धार होऊ शकतो. यासाठी फक्त पूर्ण श्रद्धा हवी.  अत्यंत भक्तीपूर्वक नामस्मरण करावे.  परमेश्वर आपला उद्धार करेलच हा विश्वास बाळगला पाहिजे.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.