Manobodh by Priya Shende Part 97 : मनोबोध भाग 97 – मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 97 -(Manobodh by Priya Shende Part 97)

मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

अहंतागुणे यातना ते फुकाची

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा

म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा

 

 

ह्या श्लोकात समर्थ सांगताहेत की जोवर अहंकार टाकून देणार नाही, तोवर मुखी नाम येणार नाही. मुखी नाम असल्याशिवाय माणसाला मुक्त मिळणार नाही.  माणसाचा शेवट दैन्यवाणा असेल आणि ते टाळण्यासाठी नामस्मरण गरजेचं आहे.

‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ असं संत नामदेव म्हणतात. असं का? तर सर्व दुःखाचे मूळ हा अहंकार आहे.  सगळ्यात गंमत म्हणजे माणसाला कळत नाही की आपण अहंकारी आहोत आणि दुसरे सांगतात ते पटत नाही.  त्यामुळे मान्य करत नाही.  म्हणूनच आपण अहंकारापासून मुक्त आहोत की नाही, याची सतत चाचपणी आपण स्वतःच केली पाहिजे.

Maval : कासारसाई धरणात बुडून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

 

संसारनाशाचं मूळ कारण अहंकार आहे. अहंकार आपल्या मनात असुरक्षित भावनेला जन्म देतो.  अहंकार यश प्राप्तीतून येतो.  पण त्याच वेळेला अपयशाची भीती मनाला पोखरच जाते.  जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता.

सर्वांना माहिती आहे मृत्यू अटळ आहे.  तरी स्वतःच्या नावाभोवती मोठं वलय निर्माण करण्याची धडपड माणूस करत असतो.  कालचक्र हे फिरतच राहणार.

त्रिकालाबाधित काय असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम.  हे कळत असून सुद्धा माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणून घेण्यासाठी धडपडतात.  जर आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत असू तर आपल्या मनाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटता कामा नये. जर आपण मनोमन घाबरत असू, एखादी चिंता मनाला सलत असेल तर आपण वृथा अभिमान बाळगतोय हे लक्षात घ्या. आपल्यातील (Manobodh by Priya Shende Part 97) अहंकार ओळखण्याचा हा एकमेव मार्ग आहे.  ज्या दिवशी मन भयमुक्त होईल त्याच दिवशी अहंकार निघून गेला असे म्हणता येईल.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक जण प्रयत्नं करतोय.  अशात अपयश आलं तर ते स्वस्थ बसू देत नाही आणि यश मिळालं तर ते गर्वाने भरून टाकेल.  यश-अपयशाकडे जेव्हा समानतेने बघायला शिकू तेव्हा आपण अहंकाराला हरवू शकू.

जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात ‘मन- बुद्धी- चित्तं- अहंकार या तत्त्वांमध्ये मी नाही. मी आहे, तो केवळ परमात्म्याच्या ठायी’.

ब्रह्मं आणि अहंकार हे दोघे परस्पर विरोधी असल्याने, अहंकारी व्यक्ती ब्रह्माची प्रचिती घेऊ शकत नाही. ब्रह्मं म्हणजे सहजता.  आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार करणे. आपल्या हातून झालेल्या चुकांची सहज क्षमा मागणे.

दुसऱ्यांच्या चुकांना सहजतेने क्षमा करणे हेच ब्रह्मंज्ञान आहे.  ह्या गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या त्यांना अहंकार शिवत नाही.  माणसाच्या मनामध्ये अहंकार, मी पणा असला म्हणजे तो स्वतःला श्रेष्ठ समजतो.  सगळ्याचं श्रेय स्वतःकडे घेतो.  आपल्या मागे कोणी आहे, परमेश्वराची कृपा आहे म्हणून आपल्याला यश मिळते, हे तो विसरतो आणि कळत नकळत भगवंताचे श्रेय देखील स्वतःकडे घेतो.  असं असल्यावर त्याच्या मुखातून रामनाम येईलच कसं?

रावण, हिरण्यकश्यपू सारखे अहंकारी राक्षस स्वतःलाच श्रेष्ठ समजू लागले. म्हणून त्यांच्या वाट्याला यातनाच आल्या.  असे मोक्षाचे म्हणजे आनंदाचे धनी कधीच होणार नाहीत.  अहंकार असलेल्या व्यक्ती शेवटपर्यंत समाधानी होत नाहीत.  मरेपर्यंत त्यांच्या वासना त्यांच्यासोबत असतात.  ते ऐहिक सुखात मग्नं असतात.  तर मुक्ती मिळणार कुठून? अशा अहंकारी व्यक्तींच्या वाट्याला फक्त यातनाच येतात.  त्यांचा अंतही अत्यंत दैन्यवाणा होतो.  अहंकारामुळे जवळचे नातेवाईक, मित्र, परिवार, मुलं सर्वांना दुखावलेलं असतं.  त्यामुळे अंतसमयी तो एकटाच पडतो.  अत्यंत लाचार अवस्थेत दीनवाणा होऊन मृत्यूला सामोरा जातो.

या उलट ज्याने अहंकार सोडून नामस्मरणाचा मार्ग अंगिकारला, तो कशातच रमत नाही.  त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण लुप्त झालेल्या असतात.  मनात फक्त ईश्वर प्राप्तीचे विचार असतात.  त्यामुळे त्यांची वाटचाल मोक्षाकडे होते.

म्हणूनच समर्थ आपल्याला सांगताहेत की आपण अहंकार टाकून (Manobodh by Priya Shende Part 97) नामस्मरणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.  नामस्मरण श्रद्धेने, एकाग्रतेनं आणि सतत करून मोक्षाचा मार्ग अवलंबला पाहिजे.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.