Nigdi : मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज – मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली असतो. संयमाचे पालन संकल्पाने होते. संकल्प केल्यास विकल्प संपून जातात. संकल्पाच्या ताकदीने हिमालयसुद्धा लीलया पार करता येतो. ज्याच्याजवळ संकल्प नाही ती लक्ष्यविहीन यात्रा आहे. जीवनात संयमाचे बंधन खूप गरजेचे असते, असे पुलकसागर महाराज यांनी चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. 

निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने चातुर्मासानिमित्त दशलक्षण पर्व महोत्सव सुरु असून बुधवारी(१९ सप्टेंबर) संयमाचे मनुष्याच्या जीवनात किती महत्वपूर्ण स्थान आहे हे सांगताना पुलकसागर महाराजांनी विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, शिवसेनेचे मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे विशेष उपस्थित होते. त्यांनी पुलकसागर महाराजांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच बारणे यांनी मनोगतदेखील व्यक्त केले. बारणे यांनी घेतलेल्या भेटीविषयी खुशी व्यक्त करताना महाराज म्हणाले की, मुनी म्हणजे सत्य आणि राजकारणी म्हणजे शक्ती. त्यामुळे सत्य आणि शक्ती एकत्र आल्यास भारत नक्कीच महासत्ता होईल.

संयमाचे महत्व सांगताना महाराज पुढे म्हणाले की, मोक्ष मिळवण्यासाठी संयम आणि नियमांची आवश्यकता आहे. प्रत्येक माणसाची कर्मे वेगवेगळी असतात. एकाच आई वडिलांची दोन, तीन मुले असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावात फरक असतो. कारण प्रत्येकाची कर्मे वेगवेगळी असतात. जसे ज्याचे कर्म तसा त्याचा स्वभाव आणि तसेच त्याचे भविष्य. आनंद साधेपणात असतो. सांसरिकाची कर्मे वेगळी, मुनींची कर्मे वेगळी. जीवनाला नियमांनी बांधायचे असते. मात्र काही बंधने ही मुक्तीची कारणे असतात.  आपल्या मनातील भाव महत्वाचा आणि त्याचेच नाव संयम.

यावेळी सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल,  कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे, अदिनाथ खोत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.