Pune : आमच्या आरक्षणात घुसखोरी नको अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही – सचिन माळी

एमपीसी न्यूज – इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी आमची ठाम भूमिका आहे. तसे केल्यास ओबीसी समाज शांत बसणार नाही, असे विद्रोही शाहीर सचिन माळी म्हणाले. एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर, ओबीसी समाजाने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्याच मुद्द्यावर आज पुण्यात राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाची पत्रकार परिषद झाली.
यावेळी शंकरराव लिंगे, सचिन माळी, प्रा. शिवाजी दळणार, अप्पा धायगुडे, सपना माळी, सुधीर पाषाणकर, प्रतापराव गुरव, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे यांची उपस्थिती होती.
“मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देता येईल. मात्र मराठा आणि ओबीसी यांच्यात सरकारला संघर्ष लावून द्यायचा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी आमची ठाम भूमिका आहे.” असे सचिन माळी म्हणाले.
मराठा समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण देणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र हा फक्त शब्दच्छेल आहे, अशी टीका सचिन माळींनी केली. तसेच, “खासगी संस्थांना सर्व्हे करण्याचा अधिकार पहिल्यांदाच मागासवर्ग आयोगाने दिला. मागासवर्ग आयोगाच्या समितीत मागासवर्गीय लोक कमी आहेत.” असा आरोपही सचिन माळींनी केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 नोव्हेंबर 2018 रोजी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “इतर मागास वर्गाला म्हणजेच ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते. त्यामुळे मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत राज्य सरकार आरक्षण देईल. त्यामुळे सध्या आरक्षण घेणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही.”
असे असतानाही ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मराठा समाजाला डिवचू नका, अन्यथा कोर्टात गेलो आणि केस केली, तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल, असा इशारा बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी समाजाला दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.