Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी – अशोक चव्हाण

एमपीसी न्यूज – आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल.

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांना विनंती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयातील एसईबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका जवळपास मान्य झाल्यासारखी आहे.

सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 8 ते 18 मार्चपर्यंत होणार आहे. 1 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्षपणे होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्ष होईल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

एसईबीसी आरक्षण प्रकरणामध्ये 18 मार्च रोजी ॲटर्नी जनरल यांनी भूमिका मांडावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. केंद्र सरकारसाठी ही एक चांगली संधी आहे.

ॲटर्नी जनरल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अनुकुलता दर्शवली तर त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.