Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे बसणार आमरण उपोषणाला 

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. ‘मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो आहे.’ असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. 26 फेब्रुवारीपासून मी स्वतः मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

उपोषणाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संभाजीराजे बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, यांनी काहीच केलं नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत.’

‘मी शाहू महाराजांचा वारस आहे, मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही.’ असे खासदार संभाजीराजे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.