Maratha reservation : येत्या 16 जूनपासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू, खासदार संभाजीराजे यांची घोषणा

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम आता संपला आहे. येत्या 16 जूनपासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू होईल आणि छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघेल, अशी घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे  यांनी आज रायगडावरून केली.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबई ते पुणे लाँग मार्च काढू, असा इशाराही त्यांनी दिला. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी जनतेशी संवाद साधला.

आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आरक्षण कसे मिळेल याचा पर्याय आम्हाला सांगा. राजकारण सोडा आणि मराठा समाजाला न्याय द्या, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. दिशा देणे हे छत्रपतींचे काम. दिशा भरकटवणे माझे काम नाही. कोणालाही दिशाहीन करणे आमच्या रक्तात नाही. ज्या समाजाने दिशा दिली त्याच मराठा समाजावर अन्याय होतोय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.