Maratha Reservation : …तर खासदारकीचा राजीनामा देणार – छत्रपती उदयनराजे भोसले

सर्वांना न्याय मिळत आहे, मग मराठा समाजानेच का वंचित रहावं?

एमपीसी न्यूज – सर्वांना न्याय मिळत आहे, मग मराठा समाजानेच का वंचित रहावं?, सरकारने मराठा आरक्षण दिले तर ठीक; अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि खासदारकीचाही राजीनामा देऊन टाकणार, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘माझी बांधिलकी जनतेशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा जनतेच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो.

मला कोर्टाचा अवमान करण्याची इच्छा नाही. पण कोर्ट म्हणजे काय मला हे कळालंच नाही. कोर्ट म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे,असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.

‘श्रेय कोणीच घेऊ नये, मग ते कोणीही असो. प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणारच. पण जर तो झाला तर मग त्याला जबाबदार कोण?, अशी विचारणा उदयनराजेंनी केली आहे.

‘नेतृत्व कोणीही करावं. पण मुख्य समस्या सोडवली जाणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, जे माझ्या मनाला पटतं ते मी करणार. मी राजकारणी नाही, राजकारण करणं आपल्याला पटत नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार.

‘मराठा आरक्षणावरुन माझी अनेकांशी चर्चा सुरु असून यामध्ये राजकारण आणलं जाऊ नये. इतरांप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ओघाने मी मराठा आहे, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित ठेऊ नका, अशी विनंती उदयनराजेंनी केली आहे. आरक्षण नाही मिळालं तर उद्रेक होईल याची जास्त भीती वाटते, असं ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.