BNR-HDR-TOP-Mobile

‘आमने सामने’ प्रेम, आपुलकीचा सुरेख संगम असलेले नाटक

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- लग्न करून केलेला संसार आणि लिव्ह इन रिलेशनशिप यामधील नवरा बायकोचे नातेसंबंध अशी मध्यवर्ती कल्पना असलेलं हलके-फुलके मनाला भावणारे ” आमने सामने ” हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.

लग्न, एक आनंददायी सोहळा, दोन कुटुंबे एकत्र येतात त्यांचे नाते संबंध जोडले जातात, हे कोणामुळे होते तर नवरा – बायको हे एकत्र येतात आणि एक सुरेख सोहळा पार पडतो, पण नवरा बायको एकत्र राहत असले तरी त्यांचा सुरवातीचा काळ सरला कि मग स्वभावामधील गुण दोष कळू लागतात, सर्व काही चांगले चालले आहे असे दाखवावे लागते अर्थात तडजोड करावी लागते. ती टिकविण्याची धडपड एकमेकाला सांभाळत करायला सुरवात होते हे सारे लग्न झालेल्या जोडप्याला अनुभवावे लागते. काही त्याला अपवाद सुद्धा असू शकतात. त्याची दुसरी बाजू ज्या वेळी तरुण-तरुणी मुलगा- मुलगी एकत्र राहायला लागतात त्यावेळी ते आपल्या विचारांची देवाण-घेवाण करीत असतात, त्यांचे लौकिक अर्थाने लग्न झालेले नसले तरी आनंदाने / सुखाने आपला काळ घालवीत असतात, त्यामधून त्यांचे सूर जुळले तर लग्न आणि नाही जुळले तर दोघे आपापल्या वाटेने निघून जातात. पण हे एकत्र रहाणे समाजाला आवडत नाही, शेवटी गाडी लग्नापर्यंत आणावीच लागते.

आमने सामने ह्या नाटकाचा विषय हा आपलासा करणारा आहे. वयस्कर झालेले जोडपे आणि त्यांच्या समोरच्या घरात राहणारे तरुण-तरुणी हे दोघेजण एकत्र राहत असतात. पण त्या दोघांच्यात फरक असा आहे कि जोडपे अनंत जोशी आणि नीलिमा जोशी ह्यांचे लग्न झालेले असून त्यांच्या लग्नाला 38/39 वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या संसार सुरु आहे. तर समोरच्या घरात राहणारा मुलगा साहिल पुरोहित आणि मुलगी समीर पाटकर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत.

साहिल पुरोहित हा लेखक असून तो कथा लिहित असतो आपली कथा कोणीतरी घेईल आणि त्यावर एखादा चित्रपट निघेल असे त्याचे स्वप्न आहे त्याला समीरा पाटकर हि साथ देत असते, ती एका कंपनी मध्ये नोकरी करीत असते असा त्यांचा सो कॉल्ड संसार सुरु असतो. साहिल आणि समीरा मध्ये भांडणे होतात, तरीही त्या मध्ये प्रेम, लोभ , राग, मत्सर अश्या सर्व भावना असतात, समोरच्या घरात राहणारे जोशी काका आणि काकू यांचे एकमेकावर अतोनात प्रेम आहे अडतीस वर्षे संसार केला आहे आणि तो करताना त्यांना तडजोड सुद्धा करावी लागली आहे.

तुम्ही प्रेम विवाह करा, एकमेकांना बघण्याच्या कार्यक्रमातून अरेंज मैरेज करा किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहा तुम्हाला आपले नाते संबंध टिकवून ठेवायचे असेल तर प्रचंड मेहनत हि घ्यावीच लागते, त्यासाठी एकमेकाचे स्वभाव, आवडी-निवडी, वगैरे ची तपासणी आधी किंवा नंतर करावीच लागते. त्यातून एकमेकांना समजून हळू हळू निर्णय घ्यावे लागतात, त्यासाठी भांडणे झाली तरी त्यात प्रेमाचा धागा ठेवावा लागतो. ह्यासाठी नाते संबंधाना प्राधान्य द्या त्याला महत्व द्या, असा संदेश हे नाटक देऊन जाते. हा संदेश देताना त्याला सहजपणे येणाऱ्या आणि होणाऱ्या विनोदाची गमतीशीर झालर लेखकांनी लावली आहे. त्यामुळे हे नाटक आपलेसे वाटते.

नाटकाची बांधणी लेखक दिग्दर्शक यांनी छान केली आहे. नाटकाचा पहिला आणि हा साहिल पुरोहित आणि समीरा पाटकर ह्यांच्या घरात घडतो त्या साहिल / समीराची कथा जोशी कुटुंब प्रेक्षकांना सांगत ह्या कथेमधील नाट्यपूर्ण घटनामध्ये सहभाग घेत असतात. आणि त्याचवेळी तरुणाईची कथा संपताना एका बिंदूवर नाटक बदलते आणि जोशी काका-काकुंची कथा साहिल – समीर सांगायला सुरवात करतात. नाट्यपूर्ण रीतीने त्याची बांधणी केली आहे. हे सारे तुम्ही अनुभवायला हवे आणि त्यामधील खरी गमंत हे प्रसंग अनुभवण्यात आहे.

साहिलची भूमिका रोहन गुजर यांनी समरसतेने केली आहे लेखक असलेला हा मुलगा काम मिळविण्यासाठी धडपड करीत असतो आणि घरी असल्याने घर सांभाळत असतो समीरा ची भूमिका मधुरा देशपांडे हिने केली आहे स्वभावाने धाडसी असून ती आपले निर्णय विचाराने घेते. तिची मते पक्की आहेत प्रेमसुद्धा ती विचार करून करते, आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व ते दोघे करतात, दोघांचे लग्न झालेले नाही तरीही ते एकत्र राहतात एकमेकाला समजून घेणे हा त्यांचा उद्देश आहे, शेवटी त्यांचे लग्न होते कि नाही हे नाटकात कळेल.

अनंत जोशी काका आणि नीलिमा जोशी काकू हे एक अनुभवी कुटुंब त्यांचा एक मुलगा अमेरिकेत आहे, जोशी काका काकू इथे एकत्र एकमेकाला सांभाळत रहात असतात. अनंत जोशी ची भूमिका मंगेश कदम यांनी केली असून त्यांनी भूमिकला योग्य तो न्याय दिलेला आहे जोशी काका हे स्वभावाने शांत, साधेभोळे, असे आहेत पण त्यांची मते पक्की आहेत. ह्या भूमिकेमधील बारकावे मंगेश कदम हे सहजतेने सादर करतात. नीलिमा जोशी काकू ची भूमिका लीना भागवत हिने उत्तमपणे सादर केली असून भूमिकेमधील मिश्कील स्वभाव आणि योग्य प्रसंगी कणखरपणा तिने छान व्यक्त केला आहे, तसेच जोशी काकुंचे तिरकस आणि खोचक बोलणे आणि सहजतेने केलेले विनोद मनाला भावतात, नाटकाचे नेपथ्य हि एक मोठी जमेची बाजू असून दोन्ही कुटुंबाची घरे प्रदीप मुळ्ये यांनी छान सजवले आहेत. संगीत आणि प्रकाश योजनाही नाटकाला पूरक अशी आहे.

आमने सामने ” हे नाटक अवनीश ह्या नाट्य संस्थेने सादर केले असून त्याची निर्मिती नाटक मंडळी या संस्थने केली आहे, आणि अथर्व ह्या नाट्य संस्थेने हे नाटक प्रकाशित केले आहे, आमने सामने चे निर्माते संतोष भरत काणेकर, लीना भागवत, महेश ओवे हे आहेत. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे, संगीताची बाजू रवी गवंडे यांनी सांभाळलेली आहे, प्रकाश योजना रवी करमरकर, वेशभूषा अमिता खोपकर, रंगभूषा अभय मोहिते यांनी केली असून या नाटकात लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर मंगेश कदम या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
प्रेम आपुलकीचा सुरेख संगम असलेले हलके-फुलके मनोरंजन करणारे एक छान हसते-खेळते नाटक पाहिल्याचे समाधान मिळेल.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement