नाटक ‘डोन्ट वरी हो जायेगा’ अंतर्मुख करणारी नाट्यकृती

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- माणूस म्हटला की त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्याच्या जीवनात नेहमी चांगले वाईट असे प्रसंग घडत असतात, त्यामधून मार्ग काढून तो आपले आयुष्य जगत असतो, कोणत्या वेळी कोणता प्रसंग समोर येईल हे त्याचे त्याला माहीत नसते, आपले मित्र मंडळी नातेवाईक शेजारचे लोक कधी मदतीला येतील किंवा एखादा अनोळखी माणूस सुद्धा आपल्याला आधार देऊन कोणता चांगला मार्ग आहे असू शकतो, समाजात जवळचे दूरचे हे कसे वागतील हे आपल्या स्वभावावर अवलंबून असतं, अडचणीच्या वेळी शांतपणे विचार केला सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते. अशाच मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाची निर्मिती दिशा या नाट्यसंस्थेने केली आहे.

आपल्याला वाटते की सगळ्या समस्या आपल्याच वाट्याला आलेल्या आहेत, बाकीचे सारे आनंदात जीवन जगत आहेत, पण तसे आयुष्यात नसतं, काहीजण आपल्या समस्या उघड करतात तर काही जण त्या कोणासमोर व्यक्त करीत नाहीत. शेवटी सकारात्मकता मनात ठेवली तर चांगले मार्ग दिसायला लागतात.

नाटकाचे कथानक एका चाळींमधील खोलीत घडतं, भास्कर कमलाबाई वाकडकर हा गृहस्थ चाळीमधल्या एका लहानशा खोलीत राहत असतो. आपले काम बरे की आपण बरं असे त्याचे आयुष्य सुरू असतानाच एक घटना घडते. त्या घटनेच्या दिवशी नेमकी त्या शहरात दंगल उसळलेली असते आणि त्यामुळे परिसरामधील सारं वातावरण भयभीत आणि संपूर्णपणे तणावाखाली असते. त्या चाळीचे सेक्रेटरी चिकटे आपल्या चाळींमधील लोकांना भेटून धीर देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याच वेळी भास्करला भेटायला एक अनोळखी मुलगी त्याच्या घरात प्रवेश करते. त्या मुलीचं नाव वीणा. ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती विमा पॉलिसी एजंट आहे.

तिला आपले विमा पॉलिसी चे टार्गेट पूर्ण करायचं असतं त्यानिमित्ताने ती भास्कर यांना भेटायला येते. त्यांनी पॉलिसी घ्यावी अशी विनंती करते पण भास्कर तिला सांगतो मला पॉलिसी नको आहे आणि बाहेर दंगलीचे तणावाचे वातावरण असताना तुम्ही घराबाहेर पडला कशाला ? असा प्रश्न विचारतो, पण तिला गरज असते आपले टार्गेट पूर्ण करायचे असते. त्याच सुमारास ती रवी नावाच्या माणसाला सतत फोन करत असते. ती आपल्या घरीसुद्धा फोन करते. रिपोर्ट आले का ? वगैरे विचारते हे सारे भास्करच्या घरातून चाललेले असते .

भास्कर त्याकडे जास्त लक्ष देत नाही पण एक क्षण असा येतो की भास्करला तिला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. त्यावेळी ती त्याला विश्वासाने सारं काय घडले ते सांगून टाकते आणि एक गंभीर समस्या भास्कर समोर उभी राहते. भास्कर हा स्वतः काही समस्येमध्ये असतो पण तो तिला माणुसकी म्हणून मदत करण्याचे ठरवतो आणि शेवटी तिला तो कशाप्रकारे मदत करतो ? तिला नेमकी समस्या काय असते ? ही समस्या कोणामुळे निर्माण झालेली असते ? आई-वडिलांना ती नेमकं काय सांगते ? या सगळ्यातून तिची सुटका कशी होते ? भास्करची सुद्धा नेमकी काय समस्या असते ? अशा अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे या नाटकात मिळतील.

नाटकाचे निर्माते प्रिया पाटील, श्लोक पाटील, उदय साटम हे आहेत. नाटकाची मूळ संकल्पना राहुल पिंगळे यांची असून नाटकाचे लेखन रोहित मोहिते, रोहित कोतेकर या दोघांनी मिळून केल आहे. नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी केले असून, नेपथ्य महेश धालवलकर, प्रकाश योजना अमोघ फडके, संगीत मितेश चिंदरकर, नृत्यदिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. या नाटकात संजय खापरे, पूर्वा फडके, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

भास्करची भूमिका संजय खापरे यांनी छान रंगवली आहे या भूमिकेने मधील गंभीर आणि विनोदाचे बारकावे त्यांनी सादर केले आहेत. वीणाची भूमिका पूर्वा फडके हिने सादर केली आहे, तिची समस्या गंभीर आहे, भूमिके मधील बारीक-सारीक बारकावे यामधून ती छान व्यक्त झाली आहे. या दोन्ही भूमिका मध्यमवर्गीय माणसाचे प्रतिनिधित्व करतात, चाळींमधील मधील सेक्रेटरी चिकटे ही भूमिका राहुल मोहिते आणि सौ चिकटेची भूमिका आसावरी ऐवळे हिने सादर केली असून त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे, गंभीरतेमध्ये विनोद पेरण्याचे काम दोघांनी सुरेख केलेआहे.

संजय खापरे यांनी हे नाटक बंदिस्तपणे सादर केल आहे. काही ठिकाणी नाटकाची गती संथ होते. असे जरी असले तरी नाटक शेवटी परिणाम साधून जाते. त्याचप्रमाणे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत हे नाटकाला पूरक असे आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या समस्येवर नाटक बांधले असून सकारात्मक विचार करून, शांतपणे आलेल्या समस्येकडे बघितले तर आपल्याला यातून मार्ग मिळू शकतो. असा संदेश देऊन नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते. सकारात्मक विचार हा मनाला नेहमी उभारी देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.