‘हिमालयाची सावली’ उत्तुंग अप्रतिम नाट्यकृती

(दीनानाथ घारपुरे )

एमपीसी न्यूज- मनामध्ये इच्छाशक्ती हि प्रभावीपणे ठासून भरली असेल तर कोणतेही काम अवघड नाही. एकदा का मनाने आपणास काय करायचे आहे हे पक्के केले कि कितीही संकटाचे डोंगर समोर आले तरी ते त्या व्यक्तीला पार करता येतात. जीवनामध्ये अडीअडचणी येतात, एखादी संस्था उभी करायची असेल तर त्यामागे मनुष्यबळ जसे आवश्यक आहे त्याच प्रमाणे घरची साथ सुद्धा लाभणे तितकेच महत्वाचे आहे. असे ध्येय निष्ठेने कार्य करणारी माणसे हिमालयापेक्षा मोठी असतात. अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आयुष्यामधील कार्याचा आलेख मांडणारी नाट्यकृती हिमालयाची सावली “ हे वसंत कानेटकर यांचे गाजलेले नाटक. हेच नाटक अद्भुत प्रोडक्शन आणि सुप्रिया प्रोडक्शन या नाट्य संस्थेने पुन्हा सादर केले आहे.

हे नाटक गुंडो गोविंद भानू आणि बयो ह्या दोन व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते, गुंडो गोविंद भानू उर्फ नानासाहेब याचं एकच ध्येय असते कि “ अनाथ अबला आश्रम “ स्थापन करायचा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे, या अश्या मोठ्या कार्यासाठी त्यांना घरातून त्यांच्या पत्नीची अर्थात बयो ची संपूर्ण साथ मिळते, बयो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्यासाठी त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते, काबाडकष्ट करून नानासाहेबांना सांभाळून आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवते. समाज सुधारणा करणाऱ्या नानासाहेबांना अनेक अडचणींना, अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते त्यावेळी बयो त्यांच्या पाठीशी उभी असते.

नाटकात अनेक नाट्यमय संघर्षाचे प्रसंग आहेत, नानासाहेबांची इच्छा शक्ती जबरदस्त असल्याने ते त्यातून मार्ग काढतात, नानासाहेबांना त्यांच्या बायकोची साथ कायम असते. मुलांच्या बरोबर होणारे वाद, कार्य करणाऱ्या सदस्यांचे विचार नानासाहेबांना कधी कधी पटत नाहीत, पण ते आपल्या मतावर ठाम असतात “ हे ठरलं आहे “ असे म्हणत ते आपले समाजकार्य करीत असतात. नाटकातील संघर्ष अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने ते कलाकारांनी सादर केले आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा ह्या मनांत ठसतात.

कलाकारांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा “ गुंडो गोविंद भानू “ हि महत्वाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा शरद पोंक्षे यांनी सहजतेने सादर करतात. ह्या व्याक्तीरेखेमधील बारीक-सारीक बारकावे, तसेच व्याक्तीरेखेमधील स्वभाव दर्शन त्यांनी छान दाखवले आहेत. शृजा प्रभुदेसाई यांनी सादर केलेली “ बयो “ ची व्यक्तिरेखा हि तितकीच महत्वाची असून ती त्यांनी उत्तमपणे साकारलेली आहे, कमालीचा अभिनय त्यातून दिसून येतो हि व्यक्तिरेखा आणि शृजा प्रभुदेसाई लक्षांत राहतात. त्यामधील सुरवातीच्या काळातील कष्ट, तसेच नानासाहेबांच्या बरोबर त्यांच्या प्रत्येक कार्यात केलेली मदत ,, इत्यादी भाव-भावनेच्या छटा प्रभावीपणे साकारलेल्या आहेत, या शिवाय जयंत घाटे, कपिल रेडेकर, कृष्णा राजशेखर, विघ्नेश जोशी, पंकज खामकर, ओमकार कर्वे, ऋतुजा चिपडे, प्रसाद सावळे, मकरंद नवघरे यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

निर्माते गोविंद चव्हाण, सुभाष रेडेकर हे आहेत. नाटकाला दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे लाभले आहे. त्यांनी हे नाटक अत्यंत बंदिस्तपणे सादर केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश योजना श्याम चव्हाण, संगीत राहुल रानडे यांचे आहे. या मध्ये शरद पोंक्षे, शृजा प्रभुदेसाई, कपिल रेडेकर, कृष्णा राजशेखर, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, ओमकार कर्वे, पंकज खामकर, ऋतुजा चिपडे , प्रसाद सावळे, मकरंद नवघरे ह्या कलाकारांनी आपल्या भूमिका सादर केल्या आहेत.

नाटकाचे नेपथ्य हे संदेश बेंद्रे यांनी अप्रतिम केले असून नेपथ्य हे सुद्धा एक व्यक्तिरेखाच आहे, इतके ते जाणवते. राहुल रानडे यांचे संगीत हे नाटकाची उंची वाढवते, श्याम चव्हाण यांनी केलेली प्रकाश योजना हि पूरक अशी आहे. एक उत्तम टीमवर्क असलेली, अभिनयाची जुगलबंदी असलेलं, एक बंदिस्त प्रभावी नात्य्कृतीचा आस्वाद नक्कीच घ्यावा. एक उत्तुंग अप्रतिम नाट्यकृती पाहिल्याचे समाधान मिळेल.

rathi Drama

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like