BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट ‘बाबा’ : भावनांचा शब्दाविण संवाद

एमपीसी न्यूज- ‘बाबा’ ह्या शब्दामध्ये खूप अर्थ भरलेला आहे, आई बाबा या दोन शब्दांची ओळख आपल्याला लहानपणापासून होते. आईचे प्रेम, वात्सल्य जिव्हाळा, आपुलकी इत्यादी भावना आपण अनुभवलेल्या असतात. प्रेमाबरोबर रागावणे हे सुद्धा त्यात आलेच. “बाबा” ह्या मध्ये सुद्धा अश्याच भावना जडलेल्या असतात. पण त्याची जाणीव कमी-अधिक प्रमाणात आपण अनुभवतो. अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर संपूर्णपणे वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारा ”बाबा” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

एका लहानश्या गावात माधव, आनंदी, आणि त्यांचा लहान मुलगा शंकर असे तिघेजण एका टेकडीजवळ रहात असतात. घरची गरीबी, काबाड कष्ट करण्याची माधव, आनंदी यांची पूर्णतयारी असल्याने असलेल्या गरीबी मध्ये त्यांचे मन प्रसन्न असते. कुटुंब म्हटले की भांडणे होणारच. पण ती तेव्हापुरतीच असतात. माधव आणि आनंदी ह्यांना बोलता येत नाही. दोघेही मुके आणि बहिरे असले तर ते सदैव सुखात राहण्याचा प्रयत्न करीत असतात. शंकर हा लहान मुलगा. त्याला सुद्धा बोलता येत नाही. पण त्याला ऐकू येत असते. गावाजवळ असलेल्या नदीच्या पलीकडे एक भला मोठा मेळा लागलेला असतो. तेथे असलेल्या वरखाली गोल फिरणाऱ्या चक्रात त्याला बसायचे असते.

आपल्या बाबांच्याकडे तो खुणेने इच्छा प्रगट करतो. पण तेथे जाणे त्याच्या आईला मान्य नसते. पण, बाबांचे शंकरवर खूप प्रेम असल्याने तो शंकरला तेथे घेऊन जातो. तेथे माधवचा मित्र त्रंबक त्याला भेटतो. तो सुद्धा गरीब काबाडकष्ट करीत जीवन जगात असतो. तो तोतरा बोलत असतो. माधवचा जिवलग मित्र असल्याने तो सुद्धा माधवला व त्यांच्या कुटुंबाला साथ देत असतो. एक दिवस माधवच्या घरी शहरात राहणारी पल्लवी नावाची बाई तेथे येते आणि माधवकडे असलेला मुलगा माझा मुलगा असून त्याला घेऊन जायला मी येथे आली आहे. त्यामुळे शंकर हा माझा मुलगा असून त्याला मी जन्म दिला आहे असे ती सांगते. माधव आणि आनंदी हे दोघे गोंधळून जातात. शंकराला त्यांनी बालपणापासून वाढवलेले असते. शंकरवर त्यांची माया, प्रेम, असल्याने माधव/ आनंदीचे शंकर बरोबर अतूट नाते निर्माण झालेले असते. ते दोघे शंकरला त्यांच्याकडे देण्यास नकार देतात. आणि पुढे हे प्रकरण कोर्टात जाते. ह्या शंकरवर खरा कोणाचा हक्क आहे ह्यावर वाद सुरु होतो.

शंकर-माधव आणि आनंदी यांना आईबाबा मानत असतो. त्यामुळे तो सुद्धा कावराबावरा होतो. प्रकरण कोर्टात गेले असल्याने त्यांना पुढची तारीख मिळते. ह्या तारखेपर्यंत काय होते हे पाहणे उचित ठरेल, शंकर हा खरोखरच पल्लवीचा मुलगा आहे का ? जर आहे तर तो माधव/आनंदीकडे कसा आला ?- कधी आला ? कोणी आणला ! त्यावेळेपासूनआत्तापर्यंत शंकरवर कोणते संस्कार झाले ? आणि शेवटी तो कोणाकडे सोपवला जातो ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे “बाबा” मध्ये मिळतील.

शंकरचे आत्ताचे आईबाबा- आनंदी आणि माधव असतात. ते बहिरे-मुके असतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलाला “बोलते” करता येत नाही. कारण ते स्वतःबोलू शकत नाही. ते दोघे मुके बहिरे असले तरी त्यांना त्यांचा स्वाभिमान आहे. आपल्या शंकरवर त्यांचे जीवापाडप्रेम आहे. ते लाचार नाहीत, कष्टकरून आपली गुजराण करीत आपला संसार ते आनंदाने करीत आहेत. शंकरसाठी दोघांचे सर्वकाही करण्याची इच्छा आहे. ते गरीब आहेत. पण ती परिस्थिती आहे. शंकरला ‘बोलायला’ शिकवण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत, दोघेही सुखात-दुःखात आनंदीच आहेत.

दीपक दोब्रायल यांनी माधवची भूमिका साकारलेली असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधील मुकेपणाचे /बहिरेपणाचे सर्व प्रसंग उत्तमपणे सादर केले आहेत. संवाद साधताना त्याला हातांनी खाणाखुणा करायला लागल्या आहेत. आणि त्यातून आनंदीबरोबर/शंकरबरोबर आणि इतर गावकरी मंडळी बरोबर संवाद साधला आहे. तीच गोष्ट आनंदीची भूमिका साकारणाऱ्या नंदिता पाटकर ला तंतोतंत लागू पडते. दोघांच्या व्यक्तिरेखा शेवटपर्यंत लक्षात राहतात. शंकरची भूमिका बालकलाकार आर्यन मेघजीनी केली असून शंकरच्या त्या वयातील निरागस भावना आहेत त्या त्याने छान व्यक्त केल्या आहेत. त्याचा बालहट्ट, आई/बाबावरील असलेले प्रेम. त्यातल्यात्यात ‘बाबा’ विषयावरील प्रेम, जिव्हाळा, अधिक जाणवला. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, जयवंत वाडकर, शैलेश दातार, चित्तरंजन गिरी, जयंत गाडेकर यांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी चित्रपट बंदिस्तपणे सादर केला असून, सुरवातीचा चित्रपट गती घ्यायला वेळ घेतो पण ती गती कथेला अनुसरूनच आहे. कधीकधी कथेची पटकथा ही गती पकडत नाही पण एकंदरीत शेवटी चित्रपट परिणाम साधून जातो. आईबाबा- आणि मुलगा यांचे अतूट नाते सुरेख दिग्दर्शित केले आहे. संगीत- छायाचित्रण-गीते- आणि कलाकारांची कामे हे सगळेच मस्तपैकी जुळून आले आहे. शब्द हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम जरी असले तरी मूक-बधिर व्यक्ती सुद्धा आपल्या भावना सहजपणे व्यक्त करू शकतात. हे सारे छान जमले आहे. सर्वांनी एकत्र बसून चित्रपट बघावा अशी ही चित्रकृती आहे. शब्दांशिवाय मनाला भावना भिडतात.चित्रपट अंतर्मुख करायला लावतो.

या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्लु मस्टँग क्रिएशन या चित्रपट संस्थेने केली आहे. निर्माते- मान्यता दत्ता आणि अशोक सुभेदार हे असून कथा पटकथा मनीष सिंग यांची आहे. अतिरिक्त पटकथा-संवाद राज आर गुप्ता, तेजस प्रभा विजय देवस्कर यांनी तयार केली आहे. ‘बाबा’ चे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांचे लाभले आहे, छायाचित्रणाची बाजू अर्जुन सोरटे यांनी सांभाळली असून मंगेश कांगणे यांच्या गीतात रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. यामध्ये दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, आर्यन मेघजी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, शैलेश दातार, जयंत ,वाडकर, जयंत गाडेकर, ह्या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like