छोटी मृणाल झाली ‘भयभीत’!

एमपीसी न्यूज- भारतीय सिनेसृष्टीत काही कलाकारांनी बालवयापासूनच अत्यंत सुरेख अभिनयाचं दर्शन घडवत रसिकांची मनं जिंकली आहेत. यात ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मराठमोळ्या बालकलाकारांचाही फार मोलाचा वाटा आहे. या परंपरेतील सहजसुंदर अभिनयाचा वारसा जपत मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमात मृणाल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू यांनी केलं आहे. ‘अॅक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा.लि’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ सिनेमाची निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांनी केली आहे.

मृणालचं नाव घेताच अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम’ या हिंदी रहस्यपटातील छोट्या मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘दृश्यम’सोबतच ‘तू ही रे’, ‘लय भारी’, ‘नागरिक’, ‘कोर्ट’, ‘टाईमपास २’, ‘अ पेईंग घोस्ट’ आणि ‘अंड्याचा फंडा’ या मराठी सिनेमांमध्येही प्रेक्षकांना मृणालच्या अभिनयाची जादू पहायला मिळाली आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेद्वारे अभिनयात पदार्पण करणाऱ्या मृणालची ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील भूमिकाही स्मरणात राहण्याजोगी होती. बालवयातच गाठीशी आलेल्या अभिनयाच्या अनुभवावर मृणालनं ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमात आणखी एक लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सस्पेंस-थ्रीलर पठडीत मोडणारा सिनेमा असल्याचं शीर्षकावरूनच लक्षात येतं. मृणालनं साकारलेली श्रेया ही व्यक्तिरेखाही सिनेमाच्या जॅानरला पूरक ठरणारी आहे.

या सिनेमात सुबोध भावे मुख्य भूमिकेत असून, प्रथमच अभिनेत्री पूर्वा गोखले मराठी सिनेमाच्या पडद्यावर झळकणार आहे. मराठीतील या दोन दिग्गज कलाकारांच्या जोडीनं मृणालनंही पूर्ण ताकदीनिशी आपली भूमिका साकारली आहे. ‘दृश्यम’मध्ये जसे तिने आश्चर्याचे धक्के दिले तसे ‘भयभीत’मध्येही ती देणार आहे. याशिवाय मधू शर्मा, गिरीजा जोशी आणि यतीन कार्येकर हे कलाकार या सिनेमात आहेत. नकाश अझीझ यांनी या सिनेमाला संगीत-पार्श्वसंगीत दिलं आहे. अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कथानकासोबतच आपापल्या व्यक्तिरेखांआधारे यातील कलाकार 28 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना ‘भयभीत’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.