Rahatani News : आशयघन, दर्जेदार चित्रपट तरीही मराठीला प्राईम टाईम मिळेना

एमपीसी न्यूज – आशयघन कथानक असलेले चित्रपट म्हणून सध्या मराठी चित्रपट सृष्टीकडे पाहिले जाते. एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती मराठीत मोठ्या पडद्यावर येत आहेत. अगदी अलीकडील टाईमपास, शाळा, सैराट, देऊळ, जोगवा, दुनियादारी, नटरंग, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, मुळशी पॅटर्न असे अनेक दर्जेदार चित्रपट सांगता येतील. या चित्रपटांनी जगभरात मराठीचा नावलौकिक केला. मात्र मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच चित्रपटगृहातील प्राईम टाईमसाठी झगडावे लागत आहे.

मराठीला चित्रपटगृहात प्राईमटाईम मिळण्याबाबत आणि मराठी चित्रपटाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रहाटणी येथील सिटीवन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनौपचारिक गप्पांची मैफिल रंगली. यावेळी मी वसंतराव चित्रपटाचे निर्माते चंद्रशेखर गोखले, गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे, वसंतराव देशपांडे फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घांगुर्डे, फोरम फॉर म्युझिक फाउंडेशनचे वासुदेव केळकर, अथर्व थिएटर्सचे डॉ. संजीवकुमार पाटील, गौरी लोंढे, सिटीवन रेकॉर्डिंग स्टुडिओचे संगीत दिग्दर्शक मंदार ढुमणे आदी उपस्थित होते.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट दर्जेदार आहे. रेटिंग देखील उत्तम आहे. प्रेक्षक चित्रपटगुहांमध्ये मागणी करीत आहेत. तरीही चित्रपट दुपारच्या वेळेला दाखवला जात आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात बहूपडदा चित्रपटगृहात (मल्टिप्लेक्स) मराठी चित्रपट लावणे बंधनकारक असल्यामुळे दिला म्हणून कुठलातरी शो (चित्रपटाची वेळ) दिली जाते.

मी वसंतराव हा अतिशय दर्जेदार चित्रपट असताना देखील गोव्यात सकाळी नऊ वाजताची वेळ मिळते. ती सुद्धा चारच दिवस. लातूर, बेळगावात देखील हीच स्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. असे असेल तर मराठी चित्रपट पुढे कसा जाणार, असा सूर रहाटणी येथील चर्चेत उमटला. हीच अवस्था अन्य मराठी चित्रपटांच्या बाबतीत असते. एखादा चित्रपट प्राईमटाईमला चालतो. त्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि मराठी चित्रपटाची देशभर चर्चा होते. प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं तर मराठी चित्रपट अन्य भाषेतील चित्रपटांच्या पुढे निघून जाईल.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दोन मल्टिप्लेक्स सुरु आहेत. पण तिथेही दुपारची वेळ मिळाली आहे. मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापन मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणावरून होते. तिथे दाक्षिणात्य राज्यातील चित्रपट मोठ्या प्रमाणात मोनोपॉली निर्माण करतात. हा मार्केटिंगचा भाग असू शकेल. मात्र अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद मिळत नसताना देखील हे चित्रपट प्राईम टाईममध्ये सुरु असतात. लोकचळवळ मराठीला तारू शकेल

प्रेक्षकांनी मराठी चित्रपट प्राईमटाईमला लागण्यासाठी मागणी करायला हवी. अनेक नागरिक मराठी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. मात्र कामाच्या वेळेत दुपारच्या वेळी चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्याने त्यांना चित्रपट पाहता येत नाही. चांगले विषय मराठीत येत आहेत. पण चित्रपटगृहात जागा न मिळाल्याने हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

बाळासाहेबांसारखा आवाज आता कुणाचा ऐकू येईल का?

सन 1971 साली दादा कोंडके यांचा सोंगाड्या हा चित्रपट आला. पण तो मुंबईत चालत नव्हता. दादांनी सुरुवातीला वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचे दरवाजे ठोठावले. पण तिथे त्यांचे काही चालले नाही म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. त्यावेळी मुंबईतील कोहिनूर थिएटरमध्ये मराठी चित्रपट लागत नसत. बाळासाहेबांनी कोहिनूरच्या मालकाला सज्जड दम दिला.

25 आठवडे पुण्यात हाऊसफुल चाललेला सोंगाड्या नंतर मुंबईतील कोहिनूरमध्ये 37 आठवडे हाऊसफुल चालला. हे केवळ बाळासाहेब ठाकरे दादांच्या पाठीशी (मराठी चित्रपटांच्या पाठीशी) उभे राहिले म्हणून शक्य झाले. पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा आवाज पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी घुमला पाहिजे. अनेक पक्षांच्या चित्रपट विंग आहेत. पण त्या केवळ सत्कारापूरत्या असल्याचे चित्र आहे. हारतुऱ्यातून बाजूला होऊन मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा सुवर्णकाळ द्यायला हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.