चित्रपट “ जजमेंट “, मनाच्या सत्य-असत्याच्या संघर्षाचा न्याय

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- माणसाच्या मनांत अनेकदा एक घडलेली घटना खोलवर रुजते आणि त्याचे मन त्या घटनेने अस्वस्थ होते, घडलेली घटना कोणत्या वयात समोर घडली यावर त्याची तीव्रता कमीजास्त होत असते. जर घटना बालवयात झाली असेल तर ती मनाच्या तळापर्यंत जाऊन बसते. त्या घटनेने बालमनावर मोठा आघात होतो. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला पुढील जीवनात मानसिक हेलखावे घ्यावे लागतात. पण त्या व्यक्तीचे मन जर खंबीर असेल तर ती त्यामधून ती सुखरूप बाहेर पडते, अश्या मध्यवर्ती कल्पनेवर एका सत्य घटनेवर आधारित नीला सत्यनारायण यांच्या “ ऋण “ ह्या कथेवर “ जजमेंट “ ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन या चित्रपट संस्थेतर्फे ही निर्मिती करण्यात आली असून त्याचे निर्माते डॉ प्रल्हाद खंदारे हे असून सहनिर्माते हर्षमोहन कृष्णात्रय हे आहेत. कथा नीला सत्यनारायण यांची असून पटकथा, संवाद, दिग्दर्शन समीर रमेश सुर्वे यांनी केले आहे. छायाचित्रण नजीर खान, संगीत नवल शास्त्री, गीते मंदार चोळकर, यांची असून यामध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान, शलाका आपटे, माधव अभ्यंकर, प्रतिक देशमुख, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई, शिल्पा गांधी-मोहिते, असे अनेक कलाकार आहेत.

_PDL_ART_BTF

ही कथा अग्निवेश साटम, नेहा साटम, ऋतुजा साटम, अनाहिता साटम या कुटुंबाभोवती फिरते. एक मध्यम वर्गीय कुटुंब पण त्या कुटुंबात एक अशी घटना घडते आणि त्यामुळे त्या कुटुंबाचे सारेजण उध्वस्त होतात. अग्निवेश साटम एक मोठे सरकारी अधिकारी असून त्यांचा स्वभाव हा बराचसा विचित्र, विक्षिप्त आणि रागीट असा असतो, मी म्हणेन ते खरे अशी त्यांची भूमिका सदैव असते. दुसऱ्यावर अधिकार गाजवायचा, आणि आपल्या सरकारी अधिकारात अनेक नको त्या गोष्टी करायच्या असे ते करीत असतात. त्यांना नेहा नावाची एक सुंदर बायको, आणि ऋतुजा आणि अनाहिता नावाच्या दोन मुली असतात. पण त्यांचे मुलींच्यावर प्रेम नसते, त्यांना मुलगा हवा असतो, त्यांची बायको नेहा हि गर्भवती राहते पण सोनोग्राफी मध्ये कळते कि तिला मुलगा होणार नाही मुलगी होणार आहे त्यावेळी ते तिचा खून करतात, आणि तो एक अपघात आहे असे भासवतात, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची मुलगी ऋतुजा हि हा खून होताना बघते. ह्याची अग्निवेश यांना कल्पना असते, त्यामुळे तिच्यावर दबाव आणून तिला खोटे बोलायला भाग पाडतात.

ऋतुजा आणि अनाहिता चे आजोबा हे त्या दोघींना आपल्या घरी घेऊन येतात. त्यांना चांगले शिक्षण देतात, आणि ऋतुजा हि वकील बनते आणि अनाहिता हि एका मानसशास्त्रीय डॉक्टरांच्या कडे सहाय्यक म्हणून कामाला लागते. ऋजुता आणि अनाहिता ह्यांचे आपल्या आईवर खूप प्रेम असते, आई हि त्यांच्या जीवनात वडिलांच्या पेक्षा अधिक जवळची असते. कालांतराने ऋतुजाला वडिलांनी केलेल्या कृत्याचा भयंकर त्रास होऊ लागतो, तिचे सतत डोके दुखू लागते, मनात सतत तेच तेच विचार येऊ लागतात, आणि तिचे मानसिक संतुलन बिघडायला सुरवात होते, अनाहिता ऋतुजाला आपल्या क्लिनिक मध्ये घेऊन येते त्यावेळी तेथे तिला यदुनाथ नावाचा मुलगा भेटतो त्याला सुद्धा तोच आजार झालेला असतो. हा यदुनाथ नेमका कोण असतो. दोघांची भेट नियती घडवून आणते.
एक दिवस ऋतुजा हि आपल्या वडिलांच्या विरोधात कोर्टात उभे राहून त्यांनी केलेल्या कृत्याची केस पुन्हा रिओपन करायची असे ती ठरवून टाकते आणि खंबीरपणे ती केस रिओपन करते. कोर्टात केस उभी असतांना तिला अनेक प्रसंगातून जावे लागते. त्यासाठी यदुनाथ आणि त्याची आई तिला मदत करतात. ह्या दोन व्यक्ती कोण असतात ? शेवटी ऋतुजाला न्याय मिळतो का ? ती तिच्या वडिलांना शिक्षा कशी करते ? हे सारे सिनेमात कळेल.

मंगेश देसाई ह्यांनी अग्निवेश साटम ची व्यक्तिरेखा अप्रतिमपणे रंगवली आहे त्याचा विक्षिप्तपणा, विचित्रपणा, रागीटपणा इत्यादी सारे भाव त्यांनी आपल्या अभिनयातून आणि देहबोली मधून खूप छान व्यक्त केल्या आहेत. मंगेश देसाई शेवट पर्यंत लक्षांत राहतो. तेजश्री प्रधान हिने ऋतुजा ची भूमिका प्रामाणिकपणे सादर केली असून तिचे आईवरील, बहिणीवरील आजोबांच्या वरील प्रेम छान दाखवले आहे. आईविषयी चे प्रेम व्यक्त करताना तिला न्याय मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न छान आहे. या शिवाय शलाका आपटे, माधव अभ्यंकर, प्रतिक देशमुख, महेंद्र तेरेदेसाई,संभाजी सावंत, इत्यादी कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. दिग्दर्शक समीरे रमेश सुर्वे यांनी कथेला न्याय दिलेला आहे तरी पण पटकथा मध्ये गतिमानता असायला हवी होती हे जाणवते. काही ठिकाणी चित्रपट गती घेत नाही रेंगाळतो, तोचतोचपणा येतो, त्यामुळे प्रेक्षकांची पकड कमी होत जाते हे जाणवते. तरीही व्यक्तिरेखा मधून त्यांनी बारकावे दिग्दर्शनातून दाखवले आहेत. कलाकारांची साथ चांगली लाभली आहे. छायाचित्रण संगीत गीत ह्या बाजू ठीक आहेत. शेवटी ह्या जजमेंट ला न्याय कोणता द्यायचा हे प्रेक्षकच ठरवतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.