चित्रपट ‘कागर’ वेगळ्या मांडणीची वेधक कथा

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- राजकारण, समाजकारण, प्रेम अशा विषयांचे वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले जाते. राजकारण करताना प्रेम प्रकरण आणि प्रेम करताना राजकारणाची जोड अर्थात त्यांची सांगड घालताना कथेमध्ये विविधता आणली जाते. अश्याच राजकारण करताना प्रेम करणारे आणि प्रेम करताना राजकारणात उडी घेणाऱ्या व्यक्तिरेखांना सामोरे ठेऊन त्यांच्यावर आधारित “ कागर “ ह्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

वायकॉम 18 स्टुडिओज आणि उदाहरणार्थ निर्मित या संस्थेने केली आहे. निर्माते सुधीर कोलते, विकास हांडे हे आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा- दिग्दर्शन मकरंद माने यांचे असून संवाद लेखन संजय पवार, मकरंद माने यांनी केले आहे. छायाचित्रण अभिजित अब्दे, संकलन सुचित्रा साठे, यांचे असून यामध्ये शुभंकर तावडे, रिंकू राजगुरू, शशांक शेंडे, सुहास पळशीकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

कागर म्हणजे अंकुर, पालवी, अशा त्याचा अर्थ असून मनाची पालवी, नव्या विचारांचा अंकुर मनामध्ये धरून एका ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीची कथा या मध्ये सादर केली आहे, एक स्वप्न बघणारी मुलगी, तिच्यावर आधारलेली हि कथा फिरते. ग्रामीण भागात मुलीना घराबाहेर पडून समाजकार्य, राजकारण करायला कमी प्रमाणात मिळते. त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने असतात. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ह्या सिनेमाची नायिका राणी आहे, तिच्या अवती-भवती जी घरातली, समाजामधील परिस्थिती निर्माण होते त्यावर हा सिनेमा भाष्य करतो. त्याच बरोबर राजकारण, समाजकारण, प्रेम हे सर्व विषय जिव्हाळ्याचे आहेत ते सुद्धा कथानकात गुंफले आहेत.

राणी ही व्यक्तिरेखा अशी आहे कि तिचे एक स्वप्न आहे. तिच्या घरात राजकारण हे पुरेपूर भरलेले आहे, राणीला राजकारणात यायचे आहे पण तिला संधी मिळत नाही. पण तिचे वडील गुरुजी हे तिच्या कळत न कळत तिला संधी उपलब्ध करून देतात. त्याच वेळी त्यांच्याच घरात गुरुजींचा उजवा हात असलेल्या युवराज वर तिचे प्रेम बसते, आणि तिचे मन त्याच्याकडे ओढले जाते. हे वागणे गुरुजीना पसंत नसते पण ते पक्के धोरणी, मुत्सद्दी , राजकारणात मुरब्बी असतात त्यामुळे ते युवराज ला तिच्या पासून वेगळे करतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्तरावर विविध प्रकारे खेळी खेळावी लागते, राणीची भूमिका रिंकू राजगुरू हिने साकारलेली असून राणीची महत्वाकांक्षा , तिचे युवराजवर असलेले प्रेम, आणि आपले वडील राजकीय गुरुजी ह्यांच्या विषयीच्या भावना छान व्यक्त केल्या आहेत.

युवराज कदम हा गावातील मुलगा, शहरात जाऊन तो इंजिनिअर ची परीक्षा पास होऊन पुन्हा गावात येतो, त्याला गावासाठी, शेतकऱ्यांच्या साठी काही करायचे असते, त्यावेळी तो गुरुजींचा आसरा घेतो, त्यांच्या कडे कार्यकर्ता म्हणून काम करतो, आणि तिथे त्याला राणी भेटते, तो तिच्या प्रेमात पडतो, ती सुद्धा त्याला त्याच्या कामात साथ द्यायचे ठरवते. युवराज ची भूमिका शुभंकर तावडे यांनी मनापासून, प्रामाणिकपणे साकारलेली आहे. भूमिकेमधील प्रेम, राग, इर्षा इत्यादी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

गुरुजी हे राजकारणात पक्के मुरलेले आहेत, राजकारणात खेळी खेळताना ते खेळाडूच्या मागे उभे राहून त्यांना जशी प्यादी हलवायची आहेत त्याप्रमाणे ते आपले डावपेच रचत असतात. गावामध्ये सुरु असलेल्या निवडणुकी मध्ये नवीन तरुण उमेदवारांना संधी मिळावी ह्या साठी ते प्रयत्नशील असतात, निवडणुकीच्या वातावरणात राजकारण कसे करावे, कोणास पुढे कोणास मागे ठेवावे ह्याचे भान ठेऊन ते डावपेच आखत राजकारण करीत असतात. अनेक उमेदवार – कार्यकर्ते यांचे ते राजकीय गुरु आहेत हि भूमिका शशांक शेंडे यांनी अप्रतिमपणे रंगवली आहे. त्यातील बारीक-सारीक बारकावे त्यांच्या अभिनयातून देहबोली मधून डोळ्यातून जाणवतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ धुरंधर राजकारणी आबासाहेब हि भूमिका सुहास पळशीकर यांनी सुरेख साकारलेली असून ती भूमिका लक्षांत राहते.

दिग्दर्शक मकरंद माने यांनी राजकारण, समाजकारण, निवडणुकामधील उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन, प्रेम, ग्रामीण भागातील राजकीय हेवेदावे, इर्षा, असे विविध प्रसंग असलेला विषय हाताळलेला आहे. हा विषय हाताळताना “ स्त्री “ ला केंद्रस्थानी ठेऊन कथा बांधणी केली आहे. नवीन युवक-युवतींनी सामाजिक कार्य करण्यासाठी पुढे यावे आणि यथाशक्ती गावाचा विकास करावा हा मुख्य गाभा पकडून त्यांनी दिग्दर्शन केल आहे, परंतु अनेक विषय एकमेकात गुंतलेले असल्याने कथेमधील व्यक्तिरेखा पुन्हा एकत्र आणताना त्यांचा काहीसा गोंधळ उडालेला जाणवतो. सिनेमामधील गीत, संगीत संकलन ठीक, बाकी चित्रपट ठीक आहे त्याचे भविष्य प्रेक्षकच ठरवतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.