चित्रपट “ आरॉन “… प्रेम, आपुलकीचा मनोवेधक

एमपीसी न्यूज- आई आणि मुलगा यांचे प्रेम हे अजरामर आहे. हे नाते अतूट असते, ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची ओढ ही एक वेगळीच उर्मी देणारी असते. अश्याच एका आई मुलाच्या प्रेमाची कथा आरॉन ह्या चित्रपटात मांडली आहे.

चित्रपटाची निर्मिती जी एन पी फिल्म्स ह्या चित्रपट संस्थेने केली असून निर्माते गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर, हे आहेत, दिग्दर्शन ओमकार रमेश शेट्टी यांनी केले आहे, पटकथा, संवाद स्वामी बाळ, आणि ओमकार शेट्टी यांचे असून छायाचित्रणाची बाजू सुमन शाहू, आणि मार्टिन विझकेलेती यांनी सांभाळलेली आहे. संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी केल आहे. संगीत चिन्मय लेले यांनी दिले आहे. या मध्ये शशांक केतकर, नेहा जोशी, अथर्व पाध्ये, स्वस्तिका मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कोकण आणि फ्रांस मधील पॅरिसच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडते, माधव आणि सुनंदा हे कोकणात राहणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब, माधव चा भाऊ केशव हा अलीता ह्या आपल्या फ्रेंच पत्नी सोबत पैरीस ला राहत असतो, अलीता हि चित्रकार असते आणि ती आरॉन ह्या टोपण नावाने चित्रे काढीत असते, त्यांना आरॉन उर्फ बाबू नावाचा एक लहान मुलगा, अलीता चा नवरा अपघातात गेल्याने ती बाबू ला कोकणात माधव आणि सुनंदा कडे सोडून पुन्हा पैरीस ला निघून जाते, तेथून ती सुरवातीला बाबू ला पत्रे लिहिते पण नंतर ती पत्रे लिहित नाही तरी पत्रे येत असतात, बाबुला आईला भेटायचे असल्याने माधव आणि बाबू पैरीस ला जातात, आणि अलीताने दिलेल्या पत्त्यावर जातात पण आई भेटत नाही, ते शोध घेतात, शेवटी बाबुला त्याची आई भेटते का ?, ह्या शोध कार्यात त्यांना किती अडचणी येतात ? त्यांना कोण मदत करते ? अश्या अनेक भावनिक प्रश्नाची उत्तरे सिनेमात मिळतील.

शशांक केतकर यांनी माधव ची आणि अथर्व पाध्ये यांनी बाबू ची भूमिका छान रंगवली आहे, नेहा जोशी हिने सुनंदाची भूमिका साकारली असून तिने काकू आणि आई च्या भावना छान व्यक्त केल्या आहेत. स्वस्तिक मुखर्जी हिने आलीया ची भूमिका ठीक केली आहे. पैरीस आणि कोकण मधील सौंदर्य छान टिपले आहे. एकच अर्थपूर्ण गाणे सुरेख आहे. एकंदरीत जिव्हाळा, प्रेम आपुलकीने नटलेली ही चित्रकृती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.