‘चोरीचा मामला’…… धमाल गोंधळ….. कमाल गडबड !

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- अशी एक म्हण आहे की चोरीचा मामला हळूहळू बोंबला चोरी करणे हे वाईटच असते पण ती चोरी कोणत्या प्रकारची आहे यावरच सगळा मामला ठरतो. एखाद्याची वस्तू त्याच्या अर्थात मालकाला न विचारता त्याच्या कळत नकळत ती पळवायची आणि उपयोगात आणायची ही चोरीच आहे परंतु अशा काही प्रकारच्या चोर्‍या असतात किंवा ती चोरी केली तरी किंवा झाली तरी त्याची बोंबाबोंब होत नाही किंबहुना अशी चोरी व्हावी असे दोघांना सुद्धा वाटत असते आता ही चोरी कसली आहे यामागचा उद्देश नेमका काय आहे हे सारे गमतीदार पद्धतीने सादर केले आहे ‘चोरीचा मामला’ या धमाल चित्रपटात.

चोरीचा मामला म्हटलं की गडबड गोंधळ आणि गडबड धावपळ ओघाने आलीच. त्यामुळे हे सगळे या सिनेमात धमाल पद्धतीने मांडले आहे. नंदन नावाचा एक चोर…. पण तो खूप प्रामाणिक आहे. त्याचे एक लहानसे कुटुंब आहे आशा नावाची त्याची बायको आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. नंदन हा प्रामाणिक चोर. ज्या बंगल्यात चोरी करायला जाणार आहे त्या बंगल्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदरच काढून ठेवली आहे. हा बंगला आहे अमरजित पाटील यांचा. अमरजित पाटील हे एक प्रतिष्ठित व्यक्ती. नंदन या बंगल्यात चोरी करायला शिरतो. चोरीच्या दरम्यान कोणी येणार नाही याची त्याला खात्री असते. त्याने बंगल्याचा फोन नंबर आपल्या बायकोकडे दिलेला असतो. सगळी तयारी करून तो रात्री आठ वाजता बंगल्यात जाऊन चोरी करायची म्हणून तो खिडकीतून आत प्रवेश करतो. घरामध्ये तिजोरी शोधतो आणि त्याला गरजेपुरते पैसे जेवढे लागतात तेवढे बॅगमध्ये भरून तो जायला निघतो. त्याचवेळी त्याला त्याच्या बायकोचा फोन येतो कारण हे सगळं होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजलेले असतात आणि नंदनची बायको त्याची घरी वाट बघत असते.

बायकोशी बोलत असताना त्याच वेळी त्या बंगल्याचा मालक अमरजीत पाटील आपल्या सोबत श्रद्धा नावाच्या एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. आता नंदनची धांदल उडते बाहेर कसे पडायचे हा विचार करीत असतानाच तेथे अमरजीतची बायको अंजली पाटील येऊन टपकते. तिच्या मनात काही वेगळेच विचार चालू असतात. दरवाजा उघडला जातो अंजलीला अमरजित पाटील यांच्यासोबत श्रद्धा दिसते आणि त्यावेळी सोबत नंदन सुद्धा दिसतो आणि मग तिथे ते तिघेजण एकमेकांना वाचवण्यासाठी नवनवीन नावे धारण करतात, आणि पुढचा गोंधळ सुरू होतो. आता कथा मी काही तुम्हाला सांगणार नाही या सिनेमातील गमतीचे रहस्य आहे ते नेमके काय आहे ते तुम्हाला सिनेमा पाहून ठरवावे लागेल.

चोरीचा मामला ह्या चित्रपटातील व्यक्तिरेखा नंदन, अमरजित पाटील, अंजली पाटील, श्रद्धा , आशा, आणि चोरांच्या मागे धावत असलेला इन्स्पेक्टर अभिनंदन साहेब आणि सोबत असलेला त्याचा हवालदार या प्रत्येक व्यक्तीरेखेने देखील एकमेकांच्या पासून काहीतरी दडवून लपवून ठेवलेले आहे, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनांत एक चांदणे लपलेले आहे, ते एकमेकांशी कसे काय जोडले गेले आहेत ते सिनेमात दिसेल

जितेंद्र जोशी यांनी नंदनची भूमिका कमालीच्या सफाईदारपणे रंगवली आहे, अमरजित पाटीलची भूमिका हेमंत ढोमे यांनी, श्रद्धाची भूमिका अमृता खानविलकर यांनी, अंजली पाटीलची भूमिका क्षिति जोग यांनी, आशाची भूमिका कीर्ती पेंढारकरने, अभिनंदनची भूमिका अनिकेत विश्वासराव यांनी तसेच हवालदाराची भूमिका रमेश वाणी यांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. चित्रपट गतिमान ठेवण्यात दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यशस्वी झाले असून फक्त मध्यंतरानंतर चित्रपटाने कमालीचा वेग घेतलाय. नाट्यपूर्ण घटना गोंधळ गडबड आणि प्रासंगिक विनोदाने हा चित्रपट खूप धमाल आणतो. चित्रपटातील गाणी पण धमाल आणतात. छायाचित्रण छान आहे.

स्वरूप स्टुडिओज या चित्रपट संस्थेने निर्मिती केली असून ह्या चित्रपटाचे निर्माते सुधाकर सुधाकर ओमले, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमले हे असून अनिरुद्ध अंकुश पाटील हे सहनिर्माते आहेत. चोरीचा मामला ह्या चित्रपटाची कथा दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांची असून पटकथा संवाद प्रियदर्शन जाधव हरीश कस्पटे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी शब्बीर नाईक यांनी सांभाळली असून जितेंद्र जोशी, मंगेश लांडगे, जय अत्रे यांच्या गीतांना चिनार महेश प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिले आहे. यामध्ये अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत धोमे, अनिकेत विश्वासराव क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर रमेश वाणी या कलाकारांनी आपल्या भूमिका छान रंगविल्या आहेत

एकंदरीत दोन तास धमाल गोंधळ बघायचा असेल आणि विनोदाचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा चित्रपट जरूर बघा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like