‘एक निर्णय’ …. अंतर्मुख करणारा निर्णय

एमपीसी न्यूज- व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, मानसिकता निराळी, त्यामुळे विचारधारणाही भिन्न-भिन्न प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, निर्णय करण्याची आणि तो घेऊन अमलात आणण्याची “ क्रिया-प्रक्रिया “ ही वेगवेगळ्या स्तरावर असते. निर्णय घेताना मानवी स्वभाव, परिस्थितीचा विचार करावा लागतो. अशीच वेळ काही कुटुंबावर येते आणि त्यातून नेमका कोणता निर्णय कश्या पद्धतीने घेतला जातो हे “ एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी यामध्ये मांडला आहे.

डॉ ईशान, मानसी, डॉ मुक्ता हे तिघे वेगवेगळ्या कारणाने आणि परिस्थितीने ते एकत्र आलेले असतात. डॉ ईशान हा बालरोग तज्ञ, त्याचे हॉस्पिटल, त्याची देखाभाग त्याचा मोठा भाऊ शंतनू बघत असतो. मानसी हि डॉ ईशान ची बायको, नुकताच त्याचं लग्न झालेलं आहे. डॉ मुक्ता हि हृदयरोग तज्ञ , जागतिक कीर्तीची डॉक्टर असते, तिचे वडील मोठे उद्योगपती, डॉ मुक्ता हि आपले आई-वडील ह्याच्या बरोबर रहात असते. लग्नानंतर मानसीला दिवस जातात, ती आई बनणार असते पण काही कारणाने तिचा गर्भपात होतो आणि ती ह्यापुढे कधीच आई होणार नसते. हा आघात मानसी सहन करते. डॉ मुक्ता ला परदेशात तिला मिळालेल्या पुरस्कारासाठी जावे लागते तिचे आई-वडील परदेशात जाताना विमान अपघातात निधन पावतात. डॉ मुक्ता हि एकटी होते, तिचे एकाकीपण तिला खायला उठते, त्याचवेळी आपणाला मुल असावे ह्याची जाणीव तिला होते आणि ती डॉ ईशान ला भेटते, आणि सांगते कि मला तुझ्या पासून मुल हवे आहे.,, पुढे नेमके काय होते ते सिनेमात पहा.

डॉ मुक्ता आपणाला मुल हे डॉ ईशान कडून व्हावे असे का सांगते ? तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात ? मानसीचे काय ? ईशानच्या घरच्या मंडळींच्या प्रतिक्रिया कोणत्या ? आणि कश्या ? मुक्ता विषयी त्यांच्या काय भावना असतात. शेवटी मुक्ता ला मुल मिळते का ? डॉ ईशानचा निर्णय काय ? मानसी कोणता निर्णय घेते ? डॉ मुक्ताने हा निर्णय का घेतलेला असतो ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.

दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी चित्रपटाची कथा छान सादर केली आहे. काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो पण शेवटी परिणाम उत्तम साधला आहे. सर्वच कलाकारांची कामे छान झाली आहेत. संगीत छान, चाली सुरेख आणि त्याचा वापर सुरेख जमला आहे. एकंदरीत एक निर्णय छान आहे.

स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी ची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केल आहे. सहनिर्माते जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओसवाल, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे आहेत. छायाचित्रण अर्चना बोऱ्हाडे, संगीत कमलेश भडकमकर, रोहन देशमुख, गीते वैभव जोशी, संकलन फैजल महाडिक इम्रान महाडिक, यांनी केल आहे, या मध्ये सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, कुंजिका काळवीट, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील, सुरभी फडणीस या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.