अंतर्मुख करणारा चित्रपट “स्माईल प्लीज

एमपीसी न्यूज- आपण सर्वजणांनी कधी ना कधी कोणत्यातरी प्रसंगामध्ये ” स्माईल प्लीज ” असे म्हंटलेलं असतेच. स्माईल प्लीज मध्ये बरेच काही दडलेलं आहे. हा शब्द कधी वापरायचा हे प्रसंगानुसार ठरलेलं असते, पण ह्या शब्दाच्या मागे बराच मोठा अर्थ दडलेला आहे, कोणीतरी कोणत्यातरी आजाराने पछाडलेला आहे, कोणत्यातरी मोठया मानसिक आघाताने खचून गेला आहे, ह्या प्रसंगात त्याला त्याच्या मनाला उभारी आणण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे वातावरण सुखकर कसे होईल इकडे लक्ष देतात आणि त्याला ” स्माईल प्लीज ” असे म्हणतात. अशाच महत्वाच्या कल्पनेवर ” स्माईल प्लीज ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाची कथा हि सुप्रसिद्ध छायाचित्रण करणाऱ्या अर्थात फोटोग्राफर नंदिनी जोशी हिच्या भोवती फिरते, नंदिनी जोशी हि एका मोठया कंपनी मध्ये कार्यरत असते, आपल्या मनातील असंख्य कल्पनेच्या आधारावर तिने विविध विषयावरील फोटोग्राफी केलेली असते , तिचे चित्रपट दिग्दर्शक शिशिर सारंग ह्यांच्या बरोबर लग्न झालेले असून त्यांना नुपूर नावाची एक मुलगी आहे. नुपूर शालेय शिक्षण घेत असते, नंदिनी जोशी आणि शिशिर सारंग यांचे बिनसलेल असल्याने ते दोघे वेगवेगळे रहात असतात, नुपूर हि शिशिर सारंग यांच्या बरोबर राहत असते नंदिनी हि आपल्या वडिलांच्या कडे अप्पांच्या कडे राहत असते. एका कर्तव्यदक्ष स्त्री च्या आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात, शिशिर सारंग यांचा चित्रपट दिग्दर्शन करण्याचा व्यवसाय ठीक चाललेला असतो आणि नंदिनीचे फोटोग्राफी चे काम व्यवस्थित सुरु असते, नंदिनी हि आपली मैत्रीण डॉ अंजली हिला भेटत असते, कारण तिला एक असाध्य आजार झालेला असतो, आणि हा आजार लाखामध्ये एकालाच होतो, आणि त्याची शिकार नंदिनी झालेली असते, ह्या आजारामध्ये माणूस आपली स्मृती घालवून बसतो, तिला आत्ताच्या घडलेल्या गोष्टी सुद्धा आठवत नाहीत, अनेक चुका ह्या व्यक्तीच्या हातून होतात, ह्या आजाराच्या कारणाने तिच्या जीवनात वादळ निर्माण होते, शिशिर चे आणि तिचे त्यामुळे बिनसते, नुपूर ला त्याची कल्पना नसते. तिच्या बालमनावर परिणाम झाल्याने ती नंदिनी ला ” आई ” म्हणून कधीच हाक मारत नाही कधीच आई म्हणत नाही. असे अनेक प्रसंग येतात जातात पण अप्पा मात्र तिचा व्यवस्थित जपत असतात,

एक दिवस अप्पांच्या घरी त्यांच्या मित्राचा ओळखीचा विराज नावाचा मुलगा नागपूर हून मुंबईला नोकरीच्या निमित्ताने त्यांच्याकडे राहण्यासाठी येतो, आणि मग परिस्थिती बदलायला सुरवात होते, विराज हा त्यांच्या घरात परका जरी असला तरी त्याला त्या घरची परिस्थिती समजायला लागते, मुळातच विराज सकारात्मक विचार करणारा असल्याने कळत न कळत तो सर्वांच्या मनात घर करतो, सर्वाना आपलेसे करतो. त्याला नंदिनीची अवस्था समजते, तिला झालेला आजार कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घेऊन तो त्याप्रमाणे तो तिच्याशी वागतो,, नंदिनी, नुपूर, शिशिर, अप्पा, ज्योती, डॉ अंजली ह्या सर्वांशी सकारत्मकतेने वागत असल्याने सगळे सुरळीत व्हायला लागते, शेवटी त्यांच्या घरात हास्याची लकेर कोणत्या मार्गाने येते ? हे जाणून घेण्यासाठी ” स्माईल प्लीज ” तुम्हाला बघायला पाहिजे.

मुक्ता बर्वे हिने नंदिनीची भूमिका अप्रतिमपणे साकारलेली आहे, तिच्या सर्व भावना तिने सहजतेने व्यक्त केल्या आहेत. फोटोग्राफी विषयाचे प्रेम, कामावरची निष्ठा, घरामधील व्यक्ती बरोबरचे वागणे, इत्यादी भावना छान दाखविल्या आहेत. प्रसाद ओक यांनी शिशिर सारंगची भूमिका केली असून नवरा आणि वडील ह्या दोन्ही भावना त्याने सुरेख व्यक्त केल्या आहेत, मुलीवरचे आणि बायको वरचे प्रेम हे छान दाखवले आहे. ललित प्रभाकर यांनी विराजची व्यक्तिरेखा केली असून त्याचा घरामध्ये असलेला वावर, त्याचप्रमाणे आप्पा, नंदिनी, नुपूर, शिशिर बरोबरचे वागणे भूमिकेला योग्य असेच केले आहे.  त्याचा वावर हा सुखकर असा झाला आहे. नुपूरची भूमिका वेदश्री महाजन हिने छान रंगवली आहे, आई विषयीच्या आधीच्या भावना आणि नंतरच्या भावना मधील फरक तिने सादर केला आहे. त्याच प्रमाणे आप्पा ची भूमिका सतीश आळेकर, ज्योतीची भूमिका तृप्ती खामकर, डॉ अंजलीची भूमिका अदिती गोवित्रीकर यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रीत्यावत प्रोडक्शन ह्या चित्रपट संस्थेने निर्मिती केली असून निर्माते निशा शाह आणि सानिका गांधी ह्या आहेत. कार्यकारी निर्माते उमेश शर्मा हे आहेत. विक्रम फडणीस यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. कथा लेखन विक्रम फडणीस यांनी केल आहे पटकथा इरावती कर्णिक, विक्रम फडणीस यांची असून संवाद लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. छायाचित्रणाची जबाबदारी मिलिंद जोग, गीते मंदार चोळकर, संगीत रोहन-रोहन यांचे आहे. या मध्ये मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, वेदश्री महाजन, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, अदिती गोवित्रीकर ह्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

दिग्दर्शक विक्रम फडणीस यांची कामगिरी खूप मोठी असून ती त्यांनी सहजतेने पार केली आहे, त्यांनी त्यांच्या कथेला पुरेपूर योग्य असा न्याय दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा महत्वाची असून त्याची मांडणी सुरेख जमली आहे. चित्रपटाला गती देत कथानकाला मधील नाट्य पूर्णपणे सांभाळत त्यांनी व्यक्तिरेखा फुलविल्या आहेत, दिग्दर्शन छान, गीत संगीत ह्या बाजू ठीक, छायाचित्रण ठीक, एकंदरीत स्माईल प्लीज हा भावनिक सिनेमा असून तो आपल्याला अंतर्मुख करायला लावतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.