अधम- एक खाणीतला अपराध की अपराधांचा उपसा

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- पुणे आणि परिसर हा खुप उद्योग धंद्याने गजबजलेला परिसर आहे …इथे जशी भरभराट आहे तसेच इथे गुन्ह्यांचे प्रमाण ही वाढत आहे. काही गुन्हे लवकर उजेडात येतात, तर काही गुन्हे काळाच्या भ्रष्टपणात दडवले जातात. त्या गुन्ह्यांचा उपसा करण्यासाठीच त्या खाणीतल्याच एखाद्याला तयार करावं लागतं किंवा कधी कधी आपापसातील असलेल्या तीव्र स्पर्धेतुन गुन्ह्यांचा डोंगर उपसला जातो.

नुकत्याच आलेल्या ‘अधम’ चित्रपटात हेच सगळं आपल्याला दिसत राहातं … आधी बिल्डरांची माल मिळवण्याची स्पर्धा, त्यातुन राजकीय महत्वाकांक्षेतुन केलेला हस्तक्षेप, त्याला दिलेली गुन्हेगारीची फोडणी आणि त्यात हरवत गेलेलं दोन जीवांच निरागस प्रेम. नंतर सगळंच उध्वस्त जंजाळ, शेवटी वावटळीतला हतबल नायक. हा या चित्रपटाचा विषय.

_MPC_DIR_MPU_II

दिग्दर्शक अभिषेक केळकर यांनी हा विषय अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने, त्याच्यातली नाट्यमयता राखत अगदी बेमालुम पध्दतीने मांडला आहे. जास्तीत जास्त वास्तववादी स्थळांवर जाऊन चित्रीकरण करणं हे कसब दिग्दर्शक आणि त्यांच्या संपुर्ण टीमने अगदी व्यवस्थित सांभाळलय ….हा या दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न असुनही नवखेपणा इथे कुठेच जाणवत नाही. व्यावसायिक गणितं आणि वास्तवरुपी सिनेमा याचं गणित फार छान सांभाळलं गेलयं.

या चित्रपटात सगळ्यांचीच कामे अगदी उत्तम झाली आहेत. विशेष उल्लेख म्हणजे शशांक शेंडेंनी साकारलेला “दत्ता” ही नकारात्मक भूमिका फारच लक्षात राहाते.किशोर कदम यांनी साकारलेला मुरब्बी राजकीय नेता त्यांच्या सहजतेने अत्यंत प्रभावशाली वाटतो. संतोष जुवेकर याने साकारलेला नायक हा अत्यंत संयतपणामुळे जास्त भिडतो. अभिनेत्री गौरी नलावडे यांनी साकारलेली नंदिनी आपल्याला या कथेत घेऊन जाते. जेव्हा तिचा दुर्देवी अंत होतो तेव्हा त्यातली भयावहता अंगावर येते. मग प्रश्न पडतो की असं समाजात खरच सुरु आहे? तोच प्रश्न समाजासाठी लढणार्‍या देशपांडे मास्तरांच्या अंतावेळीही पडतो , आणि आपल्याला काही वृत्तपत्रातुन वाचलेल्या घटना आठवायला लागतात. सुहास पळशीकरांनी साकारलेला देशपांडे मास्तर हा अगदी पोटतिडकीने या अवैध वाळु उपसा करणार्‍यांविरुध्द लढत असतो. ते तस मनोमन पाहाणार्‍याला पटणं हेच त्या कलाकाराचं यश आहे. पद्मनाभ बिंड याची या चित्रपटात एक वेगळीच भूमिका आहे. आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका संपूर्णतः वेगळीच आहे.

श्री नटराज पिक्चर्सने निर्मित केलेली आणि अभिषेक केळकर याने साकारलेली ही कलाकृती एकदा तरी पाहायलाच हवी अशीच आहे.

वास्तववादी चित्रपटातुनच प्रत्येकाला काही ना काही मिळू शकतं …इतकंच

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.