Pimpri : नवरात्रीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज

एमपीसी न्यूज – येत्या बुधवारपासून (10 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून ही खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. पिंपरी कँम्पमध्ये नवरात्रीसाठी देवीचे घट खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती.

शक्तीचे प्रतीक असणारा नवरात्र उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना करण्यात येते. काही जण मातीच्या घटाबरोबरच देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करतात. हा उत्सव सुरू होण्यास अवघे  दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे.

देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे.

देवीसाठी लागणारा लाल घट 50 रुपयाला आहे, तर काळा घट 30 रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी लागणारी परडी 30 रुपयाला आहे . पूजेसाठी लागणारे लाल कापड 50 रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू , कापूर, अगरबत्ती, गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी अखंड वात आहे. यामध्ये लांबवात, वस्त्रमाळ, फुलवात ही उपलब्ध आहे. या वाती 10रुपयाला आहेत. नारळ 15 ते 20 रुपयाला आहे. मोठी परडी 100 ते150 रुपयाला आहे, तर मंडपी 30 रुपयाला आहे. देवीचे शृंगार पाकीट 30 ते 70 रुपये, तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभाणदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटासाठी लागणारी काळी माती 10 रुपयाला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.