Pimpri – लग्न सराईला लागला ‘कोरोना’ ब्रेक

एमपीसी न्यूज – मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्न सराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोना मुळे देशात 21 दिवस लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्व नियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्न सराईला ‘कोरोना’ ब्रेक लागला आहे.
लग्न म्हणजे भरपूर खरेदी, नातेवाईक आणि जल्लोषाचे वातावरण असते. पण कोरोनाचे संकट सर्व देशात पाय पसरू लागला आणि देशात लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. जीवनावश्यक सोडून इतर सर्व वस्तूंची दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.तसेच 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा समारंभाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही लोकांना हे समारंभ पूढे ढकलले आहेत तर काहीजण पाच ते सहा नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकून घेत आहेत.

आॅनलाईनच्या जमान्यात काही ठिकाणी साखरपुडा, नामकरण, मुंज, वाढदिवस या सारखे समारंभ आॅनलाईन पद्धतीने साजरे केले जात आहेत. इतर वेळी भरघोस खरेदी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत साजरे होणारे हे समारंभ थंड पडले आहेत. सरकार कडून अशा समारंभासाठी पाच ते सहा लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली असल्याने काही लोकांनी समारंभ रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलणेच पसंद केले आहे.
लाॅकडाऊनचे आदेश धुडकावून उत्तराखंड येथील डेहराडून मध्ये लगीन घाई करणार्या एका नवरदेवाला व नातेवाईकांना डेहराडून पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना आज (शुक्रवारी) समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.