Bhosari : मोटारसायकल घेण्यासाठी पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मोटारसायकल आणि व्यवसायासाठी माहेरहून पैसे आण, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. ही घटना केशवनगर ग्रामपंचायत शेजारी मुंढवा येथे घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती अजय बाळासाहेब सावंत, सासू मनीषा बाळासाहेब सावंत आणि सासरा बाळासाहेब सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब सावंत यांच्या मुलाचा 2015 मध्ये विवाह झाला. त्यानंतर सावंत कुटुंबीयांनी नववधूकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पतीला मोटारसायकल घेण्यासाठी आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे लागणार असल्याचे वेळोवेळी कारण सांगून माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव आणला. विवाहितेने यासाठी नकार दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण केली. तसेच तिच्या माहेरच्या लोकांना दमदाटी केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.