Yerawada : एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

पुण्यातील आणखी 10 ते 15 गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

सुरजीतसिंग राजपालसिंग टाक (वय 30, रा. बिराजदारनगर, हपडसर, पुणे), गोगलसिंग शामसिंग कल्याणी (वय 47, रा. रामटेकडी हडपसर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहे. ही कारवाई बुधवारी (दि.5) येरवडा येथील आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी लोखंडी सुरे, एक स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, लोखंडी बोर कटर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, पेपर स्प्रे आदी घातक शस्त्र घेऊन एटीएम फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्या खब-यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी कार आणि मोटार सायकल असा एकूण 1 लाख 52 हजार 480 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला.

पोलिसांनी आरोपींची कस्टडी मिळवली असून पुण्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत 15 ते 16 गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक मंगेश मांगे हे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.