Pimpri News: ‘आधी एरिया सभा घेण्याचे नियम तयार करा, तोपर्यंत बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती द्या’ – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असल्यास एरिया सभा (क्षेत्र सभा) घेण्याकरता अडचणी येतात, त्यामुळे सामान्य नागरिकांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग नष्ट होतो. त्यामुळे आधी एरिया सभा घेण्याचे नियम तयार करा, तोपर्यंत बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दाखल केली. राज्य निवडणूक आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले असल्याचे भापकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील कलम 29 उप कलम ब,क,ड व इ मध्ये दुरुस्ती करावी. वॉर्ड कार्याध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करता यावी. यासाठी 29 ब व क मध्ये राज्य सरकारने या कायद्यात आवश्यक बदल करावेत अशी मागणी करतांना याचिकाकर्ते भापकर यांनी नमूद केले आहे की, कलम 29 ब नुसार एका वॉर्ड मध्ये 2 पेक्षा जास्त व 5 पेक्षा कमी मतदान केंद्रे असावीत असा नियम आहे.

पण, एका वॉर्ड मध्ये 3 प्रतिनिधी असल्यास ही संख्या 10 ते 15 मतदान केंद्रापर्यंत जाते. यामुळे वॉर्ड मोठा होतो व वॉर्ड(एरिया) सभा घेणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होत नाही. नागरिकांना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारता येत नाहीत. स्वतःचे म्हणणे देखील मांडता येत नाही. ही बाब लोकशाही साठी घातक आहे असेही याचिकेत म्हणण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.