Pimpri News : कंगना रनौत व विक्रम गोखले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – अभिनेत्री कंगना रनौत हिने भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेले विधान आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेले त्या विधानाचे समर्थन या प्रकरणी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी (दि. 10) पिंपरी पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले.

यावेळी मानव कांबळे, काशिनाथ नखाते, संतोष निसर्गंध, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, विठ्ठल कळसे, लक्ष्मण रुपनर, विश्वनाथ खंडाळे, सतीश काळे, विशाल जाधव, आनंदा कुदळे, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, आशिष शिंदे, सुमान पाटील, अशोक मोहिते, दिलीप काकडे, प्रल्हाद कांबळे, संदीपान झोंबाडे आदी उपस्थित होते.

मारुती भापकर यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांना निवेदन दिले, त्यात म्हटले आहे की, ‘सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिने ‘1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हती तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले असे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जाहीर वक्तव्य केले आहे.’ या व्यक्तव्याचे जाहीर समर्थन चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, खरेतर भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी 1857 ते 1947 या प्रदीर्घ काळात लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून प्रसंगी प्राणाची आहुती स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात हसत हसत दिली. यामध्ये अनेकांनी ब्रिटिशांच्या छातीवर गोळ्या घेत प्राणाची आहुती दिली. तर काही क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले व आपल्या प्राणाची आहुती दिली. यामध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, उधमसिंग अशा अनेक लाखो क्रांतिकारकांचा सहभाग होता.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम, सरहद्द गांधी, अशा लाखो विद्वान धुरणींनी आपल्या संसाराची तमा न बाळगता उभे आयुष्य स्वातंत्र्यांची चळवळीत खर्ची घालवुन हा देश स्वातंत्र्य केला. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने वरील जाहीर वक्तव्य करून या सर्व स्वातंत्र सैनिक, क्रांतिकारकांचा घोर अवमान केला आहे. तसेच भारतीय संविधानाच देखील अवमान केला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाबाबत भापकर यांनी पिंपरी पोलीस निरीक्षक आणि पोलीस आयुक्तांना 12 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्याबाबत पिंपरी पोलिसांनी भापकर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी करूनही गुन्हा दाखल न केल्याने पिंपरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.