Nashik News : शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी किसान सभे तर्फे भव्य ट्रॅक्टर रॅली

एमपीसी न्यूज : केंद्र शासनाने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथे गेल्या 56 दिवसा पासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभे तर्फे काल (शनिवार) खादगाव ते मनमाड 7 किमी पर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

किसान सभेचे विजय दराडे, साधना गायकवाड, गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिंग यांच्या नेतृत्वाखाली खादगाव येथून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.सात किमीच अंतर कापून ही रैली मनमाड शहरात दाखल झाल्यानंतर विविध मार्गावरून जावून ही रॅली बाजार समितीच्या आवारात आली.

येथे संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकार मुर्दाबाद,मोदी सरकार हाय-हाय, कृषीचे तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात यावे अशा जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना विजय दराडे म्हणाले की, केंद्र शासनाने केलेले 3 कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून हे कायदे लागू झाल्यास शेतकरी हा मोठ्या कंपन्यांचा गुलाम होईल, शेती त्याची असली तरी तो मालक राहणार नाही.

तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे यासाठी पंजाब, हरियाणासा यासह देशाच्या इतर भागातील हजारो शेतकरी गेल्या 56 दिवसा पासून दिल्लीत आंदोलन करीत आहे.

काही शेतकऱ्यांचा आंदोलना दरम्यान मृत्यू देखील झाला मात्र तरी देखील केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही. सदर कायदे मागे घेण्यात यावे यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी किसान सभे तर्फे  ट्रॅक्टर रली काढण्यात आली असून जर केंद्र शासनाने तिन्ही कृषी कायदे मागे नाही घेतले तर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दराडे यांनी दिला.

यावेळी आंदोलनात गुरुदीपसिंग कांत, गुरुजीतसिंग कांत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.