Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून 105 जणांवर कारवाई; 76 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ पोलिसांनी आजवर लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 105 जणांवर भारतीय दंड विधान 188, 269, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर विविध प्रकरणांमध्ये 76 वाहने जप्त केली आहेत.

वडगाव मावळ पोलिसांनी तीन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यासोबत बिट मार्शल आणि गस्त देखील सुरू आहे. हद्दीत पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि 33 कर्मचारी आहेत. तर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक अधिकारी आणि 20 कर्मचारी असा फौजफाटा देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या 4 अधिकारी आणि 53 कर्मचारी यांच्या माध्यमातून 20 मार्चपासून कोरोनाचा लढा वडगाव मावळ पोलीस लढत आहेत.

वडगाव मावळ पोलिसांनी पोलिसांसाठी आरोग्य तपासणी, सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले आहे. पोलीस ठाण्यात सॅनिटायझर रूम तयार केली आहे. त्याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 105 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मोटारसायकल आणि इतर अशी एकूण 76 वाहने जप्त केली आहेत. कारवाई केलेल्या18 जणांना न्यायालयात देखील हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 500 ते 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवैध दारू विक्रीचे 10 गुन्हे नोंदवले आहेत.

वडगाव मावळ पोलिसांनी एक एप्रिल रोजी नाकाबंदी दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या एका कारवर कारवाई करत त्यातील 16 प्रवाशांवर कारवाई केली. विशेष म्हणजे या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन केल्याचे शिक्के मारण्यात आले होते. होम क्वारंटाईनचा कालावधी संपण्यापूर्वीचे हे सर्वजण प्रवास करताना आढळून आले. या सर्वांना भेगडे लॉन्स येथे विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर वडगाव मावळ पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान एक महिला परदेशातून येऊन सातारा येथे गेल्याची माहिती सातारा पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई करून महिलेची चाचणी केली असता तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने त्या महिलेपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका टळला आहे.

वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले, “महसूल, नगरपंचायत, आरोग्य असे शासनाचे विविध विभाग एकत्रित काम करत आहेत. त्यात वरिष्ठांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. त्यामुळे पोलीस देखील त्यांचे कर्तव्य चोखपणे करीत आहेत. अवैधरित्या प्रवास होत नसून त्याबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठा सुरळीत सुरू आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.