Maval : मावळमध्ये 15 हजार मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही

15 हजार नोटाचा वापर; पोस्टल मतदान करणा-या 32 मतदारांनीही नोटालाच पसंती

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांपैकी 15 हजार 548 मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही. नन ऑफ द अबोव्ह (वरीलपैकी एकही नाही)नोटा या पर्यायाला मावळमधील 15 हजार 548 मतदारांनी पसंती दिली. यात पोस्टल मतदान करणा-या 32 मतदारांनीही नोटालाच पसंती दिली. 18 उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघात 6051 मतदारांनी नोटाला पसंती दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या 21 उमेदवारांपैकी तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. शिवसेनेचे विजयी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना 6 लाख 20 हजार 663 मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना 5 लाख 4 हजार 750 आणि वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील यांना 75 हजार 904 मते मिळाली आहेत.

पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने नन ऑफ द अबोव्ह (नोटा)चा वापर करणा-या मतदारांच्या संख्येत मावळ लोकसभा मतदारसंघात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मावळ मतदारसंघात नोटा वापरणा-या मतदारांच्या संख्येत गतवेळीपेक्षा वाढ झाली आहे. यंदा 15548 मतदारांनी नोटाला पसंती दिली. तर, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये 11186 मतदारांनी नोटाला पसंती दिली होती. गतवेळीपेक्षा यंदा 4362 जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर वाढला आहे. नोटाचा सर्वाधिक वापर पनवेल विधानसभा मतदारसंघात झाला. पनवलेमध्ये 4412, उरण 3380, चिंचवड 2882, कर्जत 1746, पिंपरी 1723 आणि सर्वांत कमी मावळमध्ये 1373 मतदारांनी नोटाचा वापर केला. पोस्टल मतदान करणा-या 32 मतदारांनीही नोटाला पसंती दिली. 18 उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते मिळाली आहेत.

‘या’ उमेदवारांना मिळाली नोटापेक्षा कमी मते

बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे यांना 10 हजार 197, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे 5 हजार 242, आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील 2 हजार 328 मते, बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील 2 हजार 570 मते, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक यांना 1 हजार 95 मते, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील यांना 2 हजार 243 मते, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड यांनी 1 हजार 746 मते घेतली.

त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत लोंढे यांना 1 हजार 63 मते, अमृता अभिजीत आपटे यांना 1 हजार 702, नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांना 2 हजार 821, प्रशांत गणपत देशमुख यांना 6 हजार 291, बाळकृष्ण धनाजी घरत यांना 3 हजार 600, राकेश प्रभाकर चव्हाण यांना 3 हजार 219, राजेंद्र मारुती काटे यांना 1 हजार 639, विजय हनुंमत रंदिल 2 हजार 91, सूरज अशोकराव खंडारे यांना 1 हजार 877, सुरेश श्रीपती तौर यांना 1 हजार 73 आणि डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ यांना 1 हजार 197 मते पडली आहे. तर, नोटाला 15 हजार 548 मतदारांनी पसंती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.