Maval : साडेसात हजारांची लाच घेताना माजी सरपंचासह ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – विद्युत वस्तू पुरवल्याची बिले काढण्यासाठी कान्हे गावच्या माजी महिला सरपंच आणि ग्रामसेवकाला साडेसात हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, शुक्रवारी (दि. 17) करण्यात आली.

पूनम राजेंद्र सातकर (वय 37, रा. भामदार पाडाळ, कान्हे फाटा, ता. मावळ), आनंदकुमार काशिनाथ होळकर (वय 41) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीला विद्युत सुविधा पुरवल्या होत्या. त्याची बिले काढण्यासाठी ग्रामसेवक आनंदकुमार याने बिलाच्या दहा टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. त्यासाठी माजी सरपंच सातकर यांनी दुजोरा दिला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पोलिसांनी परिसरात सापळा रचून शुक्रवारी साडेसात हजार रुपयांची लाच घेताना माजी सरपंच सातकर यांना रंगेहात पकडले आहे. माजी सरपंच आणि ग्रामसेवकावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.