Maval : राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केल्यानंतर काँग्रेसचा मावळवर दावा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असतानाही (Maval) पुण्याची पोटनिवडणुक लढविण्यावरुन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागांवर दावे सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा सांगितल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळवर दावा केला आहे.

राष्ट्रवादीने पुणे लोकसभा मतदारसंघात जास्त ताकद असल्याचे सांगत जागेवर दावा केला. पण, पुण्याची जागा अनेक वर्षांपासून काँग्रेस लढत आली आहे. सुरेश कलमाडी अनेक वर्ष पुण्यातून निवडून येत होते. 2014 पासून भाजप पुण्याची जागा जिंकू लागला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यामुळे जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर निवडणूक होईल की नाही अशी शक्यता असतानाच आघाडीत कोणी लढायचे यावरुन बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर दावा केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळच्या जागेवर दावा केला आहे.

Ghorpadi : अडगळीच्या खोलीत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतीच प्रदेश नेतृत्वाची भेट घेतली. या भेटीत मावळची जागा काँग्रेसने लढवावी, अशी मागणी केली होती. अन्यथा काँग्रेसचे जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात येईल, अशी भिती व्यक्त केली. पुण्यात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने राष्ट्रवादीने जागेवर दावा केला असेल. तर, मावळातही राष्ट्रवादीचा सलग तीनवेळा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळची जागा काँग्रेसला सोडावी असा तर्क काँग्रेसकडून दिला जात आहे.

माजी नगरसेवक बाबू नायर म्हणाले, मावळातून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळची (Maval) जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.