Maval: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून निम्मेच शुल्क घ्यावे : आमदार सुनील शेळके

Maval: Against the backdrop of corona, educational institutions should charge half of school fees from students: MLA Sunil Shelke

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक संस्थांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शालेय शुल्क न घेता निम्मेच शालेय शुल्क घेवून पालकांना आधार द्यावा. तसेच, नवीन प्रवेश प्रक्रिया करताना ‘डोनेशन’ अथवा विकास निधीसुद्धा कमी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत मानवतेच्या दृष्टीने विचार करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

कोरोना आणि प्रशासनाच्या उपाययोजना याबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून पोलीस खात्यातील पोलीस बांधव, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स आणि संबंधित कर्मचारी, सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स गेल्या ५० दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर नागरिक आणि स्वयंसेवक खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

तळेगाव दाभाडे येथील परिचारिका कोरोना योद्धा म्हणून काम करीत होती. संबंधित भगिनी कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. पण, आता संबंधित भगिनीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मावळ तालुक्यातून पुणे-पिंपरी-चिंचवड आदी भागांमध्ये अत्यावशक सेवा देणारे अर्थात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, शेतकरी, दूध व्यावसायिक यांची संख्या सुमारे २ हजार इतकी आहे. यापुढेही तालुक्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

घाबरु नका… सतर्क रहा… प्रशासनाला माहिती द्या..!

मावळ तालुका ऑरेंज झोनमध्ये असताना मागील चार दिवस तळेगाव शहरातील काही भाग आणि लगतचा भाग हा कन्टेन्मेंट म्हणून घोषित केला होता. प्रांतअधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला भाग सोडून काही भाग हा बफर झोन म्हणून घोषणा केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काही सुविधाही सुरू केल्या आहेत.  मात्र, यापुढील काळ कठीण आहे. या काळात अनेक स्थलांतरित नागरिक शहरात येत आहेत. तसेच, स्थानिक नागरिकही तालुक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही माहिती न लपवता, पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असेही शेळके यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.