Maval : मावळ लोकसभा मतदारसंघात दिग्गजांच्या प्रचारसभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी हा शेवटचा आठवडा असून शनिवारी (दि.27) प्रचाराची सांगता होणार आहे. या आठवड्यात दिग्गजांच्या प्रचारसभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या तोफा धडाडणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील शेवटच्या चौथ्या टप्यात म्हणजे पुढील सोमवारी (दि. 29)मतदान होणार आहे. शनिवारी (दि.27)प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी हा शेवटचा आठवडा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणूक लढवित असल्याने पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. राज्याचे दिग्गज राजकारणी अशी ओळख असलेल्या पवार घराण्यातील उमेदवार असल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजितदादांनी मुलाच्या प्रचाराची थुरा हाती घेतली आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य प्रचारात सक्रिय झाले आहेत.

यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोर लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याही सभा घेतल्या जाणार आहेत. आदित्य ठाकरे 24 एप्रिलला पिंपरीत येत आहे. तर, उद्धव ठाकरे यांची 25 एप्रिलला आकुर्डी येथे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपळेसौदागर येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन आहे.

तर, पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पनवेल परिसरात सभा घेण्याचे नियोजन आहे. आहेत. त्यासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुरुवारी काळेवाडी, दापोडी परिसरात दोन सभा घेणार आहेत. माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याही तोफा धडाडणार आहेत.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपला सहकार्य करणा-या मित्र पक्षाच्या विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 25 एप्रिल रोजी पनवेलमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात शहरात प्रचाराचा तोफा धडाडणार असून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like