Pimpri: मुख्यमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाऊ, दादा ‘गॅस’वर!

(गणेश यादव)

 
एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत दोन्ही मतदारसंघ भाजपकडे घ्या. आम्ही कमळ फुलवूच, अशी घोषणा स्थानिक आमदारांनी केली. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या पाठीशी उभे राहिल्यास मित्रपक्षाच्या खासदारांना पुन्हा संसदेत पाठवू , अशी संदिग्ध भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे लोकसभेसाठी तीव्र इच्छुक असलेल्या आमदार लक्ष्मण (भाऊ) जगताप, महेश (दादा) लांडगे, बाळा भेगडे यांना मुख्यमंत्र्यांनी ‘गॅस’वर ठेवल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
भाजपच्या पिंपरी – चिंचवड कार्यकारिणीतर्फे मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे अटल संकल्प महासंमेलन शनिवारी (दि.3) निगडी – प्राधिकरणातील पार पडले. याच्या माध्यमातून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक आमदार, पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संपूर्ण शहर भाजपमय झाले होते. कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. महासंमेलनाला नागरिकांची गर्दी देखील मोठ्या संख्येने होती.  शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात महासंमेलन होत असल्याने युतीबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता होती.
मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची  ताकद वाढली आहे. आता कार्यकर्त्यांनी वज्रमूठ बांधावी. मावळ आणि शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच आहे, असे मावळचे आमदार बाळा भेगडे म्हणाले. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हीच भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या वेळी वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखविला. महापालिकेत भाजपची सत्ता आणली. आता पुन्हा एखदा विश्वास दाखवा मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघ खेचून आणू, असे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले.
शिरूर मतदार संघात भाजपचे आमदार जास्त आहेत. शिवसेनेचा एकमेव आमदार आहे.  त्यामुळे मतदारसंघ भाजपकडे घ्या, आपला खासदर निवडणून आणू, असे आमदार योगेश टिळेकर म्हणाले. आमदार महेश लांडगे म्हणाले, शिरूर, मावळ मतदारसंघ  आपल्याकडे घ्या, दोन्ही खासदार भाजपचे असतील. तसेच लक्ष्मण (भाऊ) जगताप आणि मी भाजपात तात्पुरते आहोत, असे वातावरण निर्माण केले जात आहे. आमचे चांगले चालले आहे. परंतु, आमच्या मनात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.
स्थानिक आमदारांनी मतदारसंघ घेण्याची आग्रही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत संयमाची भूमिका घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या पाठीशी उभे राहिल्यास मित्रपक्षाच्या खासदारांना पुन्हा संसदेत पाठवू , अशी संदिग्ध भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच सभा कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. कोणाला ताकद दाखवून देण्यासाठी नाही. युती संपली म्हणूनही सभा घेतलेली नाही. पंतप्रधान मोदीच्या पाठीशी जे आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी ही सभा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप तीव्र इच्छुक आहेत. त्यांना गतवेळीच्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाऊ खासदार होणारच असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यांच्यासोबत आमदार बाळा भेगडे देखील लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहेत.  तर, शिरूरमधून लोकसभा लढण्यासाठी आमदार महेश लांडगे इच्छुक आहेत. त्यातच युती आणि दोन्ही मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदिग्ध भूमिका घेत भाऊ, दादांना गॅस’वर ठेवल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल सुरु झाली आहे. युती झाल्यास आणि विद्यमान खासदार असल्याने मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल्यास दोन्ही आमदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीला केवळ पाच महिन्याच्या अवधी राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकिय चक्रे वेगाने फिरणार आहेत. काय घडामोडी होतात, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल असे तर्क वितर्क आतापासूनच लावले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.