Maval News : महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी मावळ बंदचे आवाहन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे, उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने कथित गाडीने चिरडून शेतकऱ्यांना मारले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितांवर आयकर विभागाने छापेमारी करून कारवाई केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 11) मावळ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील सर्व व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, विविध संस्थाचे प्रमुख यांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन मावळ बंदमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती महाविकास आघाडी मधील घटकपक्षांनी केली आहे.

याबाबत आमदार सुनील शेळके, स्वाभिमानी रिपाइंचे अध्यक्ष रमेश साळवे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर व राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने चुकीचा शेतकरी (कृषी) कायदा रद्द करावा म्हणून गेले वर्षभर मोठ्या प्रमाणावर शेतकरी केंद्रसरकारच्या विरोधात दिल्ली व इतर राज्यामध्ये आंदोलन करत आहे. उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वेळोवेळी हे आंदोलन भाजपा सरकारतर्फे दाबण्याचा, भडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यामध्ये त्यांना पूर्ण यश येत नसल्याने शेतकरी आंदोलक यांना साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट केंद्र सरकारने चालवला आहे.

तसेच, उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतक-यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार घडला, हा अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. भारत कृषिप्रधान देश असताना अशी वागणूक शेतकऱ्याला कशी? असा ही सवाल पत्रकात उपस्थित केला आहे.

अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत या निंदनीय कृत्याचा तसेच
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपाशासित केंद्रसरकाच्या इनकम टॅक्स विभागाने आकसाने केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सोमवार दि 11 ऑक्टोबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद” बरोबर “मावळबंद” चे आवाहन करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून हे सरकारच्या या जुलमी कृतीचा निषेध म्हणून मावळ बंदची हाक देण्यात आलेली आहे. तरी मावळ तालुक्यातील सर्व व्यावसायिक, व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, विविध संस्थाचे प्रमुख यांनी आपापले व्यवसाय बंद ठेऊन मावळबंद मध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.