Maval : महायुतीचे बारणे अन्‌ महाआघाडीचे पवार चतुर्थीच्या मुहुर्तावर मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे दोघेही येत्या मंगळवारी (दि.9) अंगारकी चतुर्थीच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांकडून रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. पार्थ पवार मंगळवारी सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी वाल्हेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. पवार यांचा अर्ज दाखल करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, शहरातील आजी-माजी महापौर आदी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे मंगळवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याअगोदर महायुतीचे कार्यकर्ते आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढणार आहेत. निवडणूक कार्यालयामध्ये बारणे यांचा अर्ज दाखल करताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार तथा पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष सुधाकर वारभवन उपस्थित राहणार आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल. मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.