Maval : भ्रष्टाचाराचा पैसा व घराणेशाहीला नाकारत मतदारांनी विकासाला मत दिले – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीविषयी मतदारांच्या मनात असलेला प्रचंड राग मतदानातून व्यक्त झाला असून मावळची जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया शिवसेना- भाजप- आरपीआय- रासप- शिवसंग्राम- रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे बारणे यांनी आभार मानले. हा विजय मावळातील मतदारांचा आहे, असे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात व विकासपुरुष म्हणून मतदारांनी दाखविलेला विश्वास, मावळ मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, गौतम चाबुकस्वार, मनोहर भोईर, प्रचारप्रमुख गजानन चिंचवडे तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यांचा हा विजय आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत संसदेत केलेले उत्कृष्ट काम व मावळ लोकसभा मतदारसंघात सातत्याने ठेवलेला जनसंपर्क यामुळे मतदार आपल्याबरोबर राहिले, असे बारणे म्हणाले.

  • भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीला मतदारांनी साफ नाकारल्याचे निकालावरून दिसून येते. अजित पवार यांनी स्वतःच्या पुत्राला मावळ मतदारसंघावर लादल्याचा मतदारांच्या मनात राग होता. तो त्यांच्या मतदानातून बाहेर आला, असा शेराही त्यांनी मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.