Maval: अखेर खासदार श्रीरंग बारणे अन् आमदार लक्ष्मण जगताप यांचे सूर जुळले (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज (सोमवारी)अखेर सूर जुळले आहेत. दोघांचे मनोमिलन झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले आहे. बारणे आणि जगताप दोघांचीही पिंपरीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. आश्चर्य म्हणजे दोघेही पत्रकार परिषदेला एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीला दोघांच्या पक्षाची युती झाली. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळची जागा शिवसेनेकडेच राहिली. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. युती धर्माचे पालन करू अशी हमी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तर, बारणे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी मित्र पक्षाचे काम करावे, असे आवाहन केले होते.

परंतु, आमदार लक्ष्मण जगताप हे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर होता. त्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी पुढाकार घेत जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली होती. जगताप यांच्यासोबतच्या मतभेदला पूर्णविराम दिल्याचे सांगितले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत, उपनेत्या निलम गो-हे यांनी देखील जगताप यांची भेट घेत प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली होती. या दिलजमाईसाठी शिवसेनेचे राज्य संघटक आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी देखील पुढाकार घेतला होता.  त्यानंतरही जगताप प्रचारात सक्रिय झाले नव्हते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. तो निरोप महाजन यांनी जगताप यांना सांगितला. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतरही जगताप प्रचारात सक्रिय झाले नव्हते.

रविवारी पुन्हा महाजन, बारणे आणि जगताप यांच्यात एकत्रित बैठक झाली. दोघांमध्ये मनोमिलन घडविण्यात महाजन यशस्वी झाले आहेत. त्यानंतर आज (सोमवारी) दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलन झाल्याचे सांगितले. बारणे आणि जगताप यांच्यात ‘समेट’ झाल्याने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.