Maval : कच्चे चिकन दिल्याबद्दल जाब विचारणाऱ्या ग्राहकांना ढाबा मालकाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कच्चे चिकन दिल्यावरून ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाला हॉटेल मालकाने पाठलाग करून लाकडी दांडके आणि तलवारीने मारहाण केली. ही घटना कान्हे गावच्या हद्दीत घडली.

अभिषेक सुधाकर पर्णीकर, प्रितिष पिल्ले, संकेत कांबळे (रा. गुलटेकडी, पुणे) अशी जखमी ग्राहकांची नावे आहेत. याप्रकरणी पर्णीकर यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लवलीसींग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई रोडवर कान्हे फाट्याजवळ आरोपी लवलीसिंग याचा अप्सरा ढाबा आहे. फिर्यादी आणि त्यांचे मित्र अप्सरा ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. त्यांनी चिकन मसाला या मेनूची ऑर्डर दिली. ऑर्डरमध्ये आलेले चिकन कच्चे होते. त्यावरून फिर्यादी ग्राहक आणि आरोपी ढाब्याचा मालक यांचे भांडण झाले. त्यानंतर, फिर्यादी त्यांच्या मित्रासह पुण्याकडे निघून गेले.

काही अंतर गेल्यानंतर आरोपी त्याच्या आठ ते दहा साथीदारांना कारमधून आला. त्याने फिर्यादी यांच्या कारसमोर त्याची चार लावून कारवर दगड मारून काचा फोडल्या. लाकडी दांडके आणि तलवारीच्या उलट्या बाजूने मारहाण केली. भांडणाच्या भीतीपोटी फिर्यादी यांचे दोन मित्र पळून गेले. आरोपींनी फिर्यादी यांना पकडून ढाब्यावर आणले. ढाब्यावर एका खोलीत कोंडून पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे ब्रेसलेट या भांडणात गहाळ झाले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

तर पर्णीकर आणि त्यांच्या मित्रांनी हॉटेलमध्ये वाद झाल्यानंतर हॉटेलच्या पत्र्यावर दगड मारले असल्याने त्यांचा पाठलाग केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like