Maval : उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले पण निधी इतर ठिकाणी वळवला… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही रस्ता नसल्याने होतोय जलप्रवास

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर मावळ लोकसभा (Maval) मतदारसंघात असलेल्या तुंगी या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचविण्यात आली. परंतु औद्योगिकीकरण, शहरीकरण अगदी हाकेच्या अंतरावर सुरू असताना वराळे – नाणोली गावातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रस्ता मिळालेला नाही. जवळचा मार्ग म्हणून इंद्रायणी नदीतून हे ग्रामस्थ अजूनही होडीने प्रवास करतात.

दरम्यान या ठिकाणी सन 1985 च्या सुमारास उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र या कामाचा निधी इतर ठिकाणी वळविल्याने उड्डाणपुलाचे काम शासनाच्या फायलींमध्ये अडकून पडले.पुन्हा एकदा तीन वर्षापूर्वी 6 कोटी रूपये खर्चून वराळे- नाणोली या ठिकाणी पूल बांधण्याची घोषणा शासनाने केली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या कामी नाबार्डकडून सहा कोटी रूपये निधी मंजूर करूनही घेतला आणि ऑक्टोबरमध्ये कामाला सुरूवात होईल असे सांगितले होते. मात्र ते आश्वासनच ठरले.

वराळे – नाणोली नागरिकांना तळेगावला येण्या जाण्यासाठी जवळचा मार्ग नाही. त्यामुळे येथील नागरिक, दुग्धव्यावसायीक,शाळकरी मुले, नोकरदार यांना अजूनही होडीनेच जलप्रवास करावा लागत आहे.

होडी चालक बिबाबाई बळीराम गव्हाणे आणि त्यांचा मुलगा नागरिकांची दिवसभर वाहतूक करून आपला उदरनिर्वाह करतात. शासकीय मानधन नसल्याने नागरिक देतील ते भाडे घेऊन गव्हाणे कुटुंबाची तिसरी पिढी दोन गावांचा दुवा बनत आहे.

Chakan : अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा दाखल

धोकादायक वाहतूक करत असताना यांना कुठलाही विमा नाही. इंद्रायणी नदीच्या दोन तीरावरील दोन झाडांना लोखंडी रोप /दोर बांधून तो दोर हातात धरूनच शेवटपर्यंत हा धोकादायक प्रवास चालू आहे. पावसाळ्यातही पाणी वाढल्यावर दोर वरती बांधून नागरिकांना पैलतीरावर ने आण करण्याची अव्याहत आणि अवघड कामगिरी दोघे मायलेक करत आहेत.जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे यांच्या सहकार्याने नाव उपलब्ध होत आहे. काही वर्षांपूर्वी सहा कोटी रुपये खर्चून या ठिकाणी पूल बांधायची घोषणा शासनाने केली होती. परंतु ती घोषणा इंद्रायणीच्या प्रहावात वाहून गेली…

आजूबाजूला एमआयडीसी आणि  स्मार्ट शहरीकरण परंतु एका कोपऱ्यात मात्र अजूनही पुराणकालीन जलसेवा एका नावेतून होत असताना खरंच  मावळचा विकास झालाय का ? अशी चर्चा या औद्योगिक क्षेत्रातील वराळे-नाणोली परिसरातील नागरिक करत आहेत. धरण उशाला, कोरड घशाला ह्या म्हणीप्रमाणे या परिसरातील नागरीकांची गत झाली (Maval) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.