Maval: भाजप जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित; रविवारी शपथविधी

मावळातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, त्यांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेगडे यांना दूरध्वनी करून त्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. तसेच त्यांचे अभिनंदन केले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भेगडे यांना शुभेच्छा दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मावळात सलग पाच वेळा भाजपचा आमदार निवडून येत आहे.

  • बाळा भेगडे सलग दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुणे जिल्हा भाजपचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांसाठी का होईना, मावळला मंत्रिपद मिळणार असल्याने मावळातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जल्लोषाची जोरदार सुरू आहे.

यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना 1988 च्या सुमारास मदन बाफना यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच मावळला मंत्रिपद मिळत आहे. तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.