Maval : व्यापाऱ्याच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक

Both the accused in the murder case of the trader have been arrested : आरोपींना बुधवार (दि. 29) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून तिघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली होती. या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

सागर अशोक सातकर (वय 23, रा. कान्हे, ता. मावळ) व चेतन पोपट जाधव (वय 21, रा. खामशेत, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घेवरचंद कान्हाराम परमार (वय 56, रा. कान्हे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परमार हे किराणा मालाचे व्यापारी होते. त्यांनी 25 वर्षांपूर्वी अशोक सातकर यांच्याकडून कान्हे फाटा येथे घर बांधण्यासाठी जागा विकत घेतली होती. त्या जागेत परमार कुटुंब घर बांधून राहत आहे.

दरम्यान, अशोक सातकर यांचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी अशोक सातकर यांचा मुलगा सागर सातकर हा परमार यांच्याकडे आला. ‘आमची जागा तुझ्याकडे जास्त निघत आहे. त्या जागेचे पैसे दे’ अशी सागर याने परमार यांच्याकडे मागणी केली. त्यावर परमार यांनी ‘जागेची मोजणी करून बघू आणि त्यानंतर पैसे किती द्यायचे ते ठरवू’ असे सांगितले.

दोन-तीन दिवसांपूर्वी सागर पुन्हा परमार यांच्याकडे आला आणि पुन्हा पैशांची मागणी केली. त्यानंतर जागेची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सागर आणि परमार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

बुधवारी सायंकाळी आरोपी परमार यांच्याकडे आले. सागर याच्या हातात कोयता होता, तर त्याच्या साथीदाराकडे चाकूसारखे हऱ्यार होते. दोघांनी परमार यांच्यावर सपासप वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या परमार यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे, कर्मचारी दीपक गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, गणेश तावरे व रवींद्र रॉय आदींच्या पथकाने आरोपीचा मागोवा काढत जंगजंग पछाडून काढले.

दरम्यान आरोपी सागर हा त्याचा मामा बाबाजी गायकवाड (रा. कांब्रे, नाणे मावळ) येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून खुनातील आरोपी सागर सातकर यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी शुक्रवारी (दि. 24) दुपारी एक वाजताच्या सुमारास अटक केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, आरोपींना बुधवार (दि. 29) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी सागर सातकर व अल्पवयीन आरोपी यांना आरोपी चेतन जाधव यांने कोयता व चाकू पुरविला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.