Maval : व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या प्रतिसादात महायुतीची पिंपरी कॅम्पमध्ये रॅली उत्साहात

एमपीसी न्यूज- शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी पिंपरी येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील व्यापारी बांधव तसेच मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक संदीप वाघेरे, दिपक मेवाणी, किशोर केसवानी, लच्छु बुलानी, कमल मलकानी, ज्योतिका मलकानी, आरपीआयचे लक्ष्मण गायकवाड, शिवसेनेचे डाॅ. अभिजित भालशंकर, विभाग प्रमुख अनिल पारचा, उपविभाग प्रमुख शेखर महाडिक, सोनू शिरसाट, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीची सुरुवात आंबेडकर कॉलनी रिव्हर रोड पिंपरी येथून झाली. ही रॅली पुढे बौद्ध नगर, भाटनगर, मेन बाजार, शगुन चौक, साई चौक, जायका चौक, जयहिंद चौक, अशोक थिएटर परिसर, डिलक्स रोड, रिव्हर रोड, सुभाष नगर आणि पुन्हा शगुन चौक या मार्गावरून काढण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी बांधवांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे स्वागत केले. ठीकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘महायुतीचा विजय असो’, ‘श्रीरंग बारणे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांच्या जयघोषात ही रॅली संपन्न झाली. भगवी लाट, भगवा जोश, शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणा, सर्व कार्यकर्त्यांच्या गळयात असलेले भगवे उपरणे यामुळे संपूर्ण बाजारपेठ भगवीमय झाल्याचे दृश्य या परिसरात पहायला मिळाले. दरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. यातून महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले स्वयंशिस्तीचे महत्व अधोरेखित झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.