Maval:  मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करा- खासदार बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

Complete pre-monsoon works immediately - MP Barne's instructions to officials

मावळ तालुक्याची  मॉन्सूनपूर्व  आढावा बैठक

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळामुळे मावळमधील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मावळकरांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिल्या. तसेच राजमाची किल्ला परिसरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी  सूचनाही  त्यांनी केली.

मावळ तालुक्याची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक खासदार बारणे यांनी आज (गुरुवारी) घेतली. आमदार सुनील शेळके, प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी एस.वाय.माळी यासह तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मॉन्सूनपूर्व  बैठक दरवर्षी घेतली जाते. परंतु, यंदा निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेले नुकसान, येणारा मॉन्सून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे  लाईटचे पोल पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ब-याच गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा सुरु झालेला नाही.

अजूनही जवळपास 500 पडलेले पोल उभे करायचे आहेत. येत्या चार दिवसात हे सर्व काम पूर्ण करुन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिका-यांनी दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पावसाळ्यातही वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. पवना, आंद्रा, उडवळे हे मोठी धरणे मावळात आहेत. धरण परिसरात लाईट नसून त्याचे कामही  तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.

वादळीवा-यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिग विद्युत पोलवर  पडले आहेत.  त्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. मावळमूधन एनएच 4 आणि एक्सप्रेस वे जातो. एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी  या विभागांनी  अनधिकृत पोलची माहिती घ्यावी. अनधिकृत पोल हटविण्यात यावेत.

राजमाची किल्ल्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. किल्यावरील मोठ-मोठी झाडे पडली आहेत. मागील पावसाळ्यात रस्ते वाहून गेले होते.

वनखात्याच्या जागेतून करण्यात येणा-या रस्त्यांचे प्रस्ताव पीडब्ल्यूडीने तयार करावेत. याकामी वनखात्यानेही सहकार्य करावे, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हे पूर्ण होत आले आहेत. मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी काळजीपूर्वक सर्व्हे करावेत. मावळ तालुक्यातील अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयांची हानी झाली आहे. सर्व नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे.

यावेळी कृषी विषयक कामाचाही आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे उपलब्ध आहेत. शेतक-यांना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. लागवडी क्षेत्राला सरकारच्या वतीने लागणारी मदत करण्याच्याही सूचना संबंधितांना खासदार बारणे यांनी यावेळी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like